मुंबई : दाक्षिणात्य कला जगतामध्ये सुपरस्टार्सच्या यादीत अभिनेता धनुष (Dhanush)याचंही नाव येतं. आपल्या अनोख्या अभिनय शैलीमुळं धनुष कायमच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. पण, इथं आयुष्य़ाचा आणि सहजीवनाचा त्याचा चित्रपट मात्र सुपरहिट ठरलेला नाही.
तब्बल 18 वर्षांच्या नात्यानंतर आता धनुष आणि सुपरस्टार रजीनाकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत (Aishwarya Rajnikanth)विभक्त झाले आहेत.
या सेलिब्रिटी जोडीच्या विभक्त होण्याच्या बातमीनं सर्वांनाच धक्का बसला. नेमकं त्यांच्या नात्यात इतका टोकाचा निर्णय का घेतला गेला हाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करु लागला आहे.
2004 मध्ये धनुष आणि ऐश्वर्यानं कुटुंबीयांच्या उपस्थित मोठ्या दिमाखात लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी ऐश्वर्या 23 तर, धनुष 21 वर्षांचा होता.
तुम्हाला माहितीये का, असं म्हटलं जातं की धनुष आणि ऐश्वर्याचं लग्न हे अतिघाईमध्ये लावण्यात आलं होतं.
'काढाल कोंडे' या चित्रपटाच्या वेळी ऐश्वर्या आणि धनुषची ओळख झाली होती. चित्रपटाच्या पहिल्याच शोसाठी धनुष त्याच्या कुटुंबासमवेत आला होता.
तिथं रजनीकांत यांच्या दोन्ही मुली, ऐश्वर्या आणि सौंदर्या हजर होत्या. त्यावेळी त्यांच्यात तोंडओळख होण्यापुरताच संवाद झाला होता.
दुसऱ्या दिवशी ऐश्वर्यानं धनुषच्या घरी फुलगुच्छ पाठवत ओळख ठेवण्यास सांगितलं आणि पुढे त्यांच्या भेटीगाठींचं सत्र सुरु झालं.
माध्यमांच्या नजरेतून नातं लपू शकलं नाही....
धनुष आणि ऐश्वर्या जवळपास दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. तेव्हाच माध्यमांच्या नजरेतही ही जोडी आली.
आपल्या मुलीबाबत असं काही लिहिलं जावं अशी रजनीकांत आणि त्यांच्या कुटुंबाची मुळीच इच्छा नव्हती. ज्यामुळं लगेचच या दोघांचं लग्न ठरवण्यात आलं.
दोन वर्षांच्या नात्यानंतर लगेचच धनुष आणि ऐश्वर्याचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात झालं.
एका मुलाखतीत खुद्द ऐश्वर्यानंच आपलं कुटुंब हे जुन्या विचारसणीकडे जास्त झुकणारं असल्यामुळं आमचं लग्न हे घाईघाईत झाल्याचा उलगडा केला होता.
असं असतानाही आपण मात्र या लग्नानं फार आनंदात असल्याचंही ती म्हणाली होती.
परिस्थिती आता बदललीये...
ज्या नात्याची प्रेमापासून सुरुवात झाली होती, तेच नातं आता एका वेगळ्या वळणावर आलं आहे. जिथून या दोघांनीही वेगळ्या वाटा निवडल्या आहेत.
18 वर्षांच्या नात्यानंतर आता वेळ आली आहे की एक व्यक्ती म्हणून स्वत:ला समजून घ्यावं. असं लिहित धनुष आणि ऐश्वर्या या दोघांनीही त्यांच्या या नात्याला पूर्णविराम दिला.