मुंबई : भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. निधन झालं तेव्हा त्या गोव्यात होत्या. सोनाली फोगट त्यांच्या काही कर्मचाऱ्यांसोबत गोव्यात गेल्या होत्या. सोनाली फोगट यांच्या निधनामुळे राजकीय आणि बॉलिवूड विश्वात शोककळा पसरली आहे. सोनाली यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला देखील मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, सोनाली फोगट आणि आईचं रात्री फोनवर बोलणं झाल्याची माहिती त्यांच्या बहिणीने दिली आहे.
सोनाली फोगट आणि आई यांच्यात झालेला शेवटचा फोन
आईला फोन केल्यानंतर जेवणात काही तरी गडबड असल्याचं सोनाली यांनी आईला सांगितलं, 'जेवल्यानंतर मला अस्वस्थ वाटत होतं. जेवल्यानंतर मला काही तरी गडबड असल्यासारखं वाटत होत...' सोनाली फोगट यांच्या संशयास्पद मृत्यूवर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
पतीच्या निधनानंतर राजकारणात सोनाली यांचा प्रवेश
सोनाली फोगट यांच्या खासगी आयुष्यात अनेक चढ उतार होते. राजकारणात येण्यापूर्वी त्यांचं लग्न राजकारणी संजय फोगट यांच्याशी झालं होतं, पण 2016 मध्ये त्यांचे निधन झालं. यानंतर अभिनेत्रीने राजकारणात पाऊल ठेवलं आणि नाव कमावलं. सोनाली फोगट यांना एक मुलगीही आहे. त्यांच्या मुलीचं नाव यशोधरा असं आहे.
2016 मध्ये, सोनाली फोगट प्रसिद्धीच्या झोतात आल्या जेव्हा पती संजय यांचा फार्म हाऊसमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. सोनाली त्यावेळी मुंबईत होत्या. सोनालीचे पती राजकारणात सक्रिय होते. पतीच्या निधनानंतर सोनाली यांना मोठा धक्का बसला होता.