Palash Sen Wears Mothers Mangalsutra: 90 च्या दशकात 'मायेरी', 'कभी आना तू मेरी गली' सारखी गाणी गाऊन तरुणांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारा गायक पलाश सेन (Palash Sen) आजही तितकाच प्रसिद्ध आहे. इतक्या वर्षानंतरही पलाश सेनने तरुणांच्या मनातील आपलं स्थान कायम ठेवलं आहे. पलाश सेन ऑर्थोपेडिक आणि गायक आहे. याशिवाय तो गीतकार आणि संगीतकारही आहे. पण तुम्हाला पलाश सेनबद्दल एक रंजक किस्सा माहिती आहे का? पलाश सेन आपल्या आईचं मंगळसूत्र घालतो. याचं कारण ऐकलंत तर तुम्ही भावूक व्हाल.
पलाश सेनने 1998 मध्ये दिल्लीत आपला म्युझिक बँड युफोरिया सुरु केला होता. यानंतर 2001 मध्ये त्याने 'फिलहाल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा वर्गमित्र असणारा पलाश सेन आपल्या आईच्या फार जवळ आहे. आईवर असलेल्या प्रेमाखातर तो नेहमी आईचं मंगळसूत्र घालतो. एका मुलाखतीत त्याने याचा खुलासा केला होता.
आपल्या आईकडे प्रचंड इच्छाशक्ती असून वयाच्या ८ व्या वर्षी तिने चालत लाहोरहून जम्मू गाठलं होतं असं पलाश सेनने सांगितलं आहे. तसंच वडिलांच्या मृत्यूनंतर आईचं मंगळसूत्र घालण्यास सुरुवात केल्याची माहिती दिली आहे.
"जेव्हा तुमचे भक्कम असता तेव्हा आयुष्याचे फंडेही तितकेच भक्कम असतात. यामुळेच कदाचित माझ्यात आणि माझ्या आईमध्ये अनेक गोष्टींवरुन वाद होतो आणि भांडणंही होतात. ती माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर तिने मंगळसूत्र घालणं बंद केलं होतं. यानंतर मी ते मंगळसूत्र घालू लागलो. मी ते नेहमीच घालतो. यामुळे तिचे आशीर्वाद नेहमी माझ्यासह आहेत असं वाटत राहतं", असा खुलासा पलाश सेनने केला आहे.
पलाश सेन आणि शाहरुख खान वर्गमित्र आहेत. दिल्लीमधील सेंट कोलुम्बा शाळेत ते एकत्र होते. सोनू निगन तसंच इतर गायकांच्या आधीच आपण शाहरुखसाठी गाणं गाण्यास सुरुवात केली होती असं पलाशने सांगितलं आहे. तो म्हणतो "मी आणि शाहरुख शाळेत अभिनेते होतो. आम्ही एकाच वर्गात होतो. मला गाता येत होतं आणि शाहरुखला ते जमत नव्हतं. आम्ही एक म्युझिकल कार्यक्रम केला होता, ज्यामध्ये मी शाहरुखाठी गाणं गायलो होतो. त्यामुळे सोनू निगम आणि इतर सर्व गायकांच्या आधी मी शाहरुखसाठी गाणं गायलं आहे".
पलाश सेनने 1998 मध्ये दिल्लीत आपला म्युझिक बँड युफोरिया सुरु केला होता. धूम पिचक धूम, मायेरी, अब ना जा, आना मेरी गली, सोने दे मा, सोनेया अशा अनेक गाण्यांमुळे युफोरिया बँड प्रसिद्ध झाला होता. पलाश सेनने 2001 मध्ये मेघना गुलजार यांच्या 'फिलहाल' चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं होतं.