"हे त्यांचं 'सुंदर' असणं दिसत राहणार"; शुभांगी गोखलेंनी शेअर केली खास आठवण

आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळे निधन 

Updated: Sep 22, 2020, 07:51 PM IST
"हे त्यांचं 'सुंदर' असणं दिसत राहणार"; शुभांगी गोखलेंनी शेअर केली खास आठवण  title=

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच निधन झालं. वयाच्या ७९व्या वर्षी आशालता यांच निधन झालं. 'माझी आई काळुबाई' या मालिकेच्या सेटवर त्यांना कोरोनाची बाधा झाली आणि त्यामध्येच त्यांच निधन झालं. आशालता यांच्या अशा अचानक जाण्याने मराठी सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराने दुःख व्यक्त केलं. अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी आशालता यांची एक खास आठवण शेअर केली आहे. 

आशालता यांच्या पर्समधील चिमुकल्या पुड्यांचं गुपित उलगडलं आहे. आशालता यांना आपल्या पर्समध्ये विविध बिया ठेवायची सवय होती. या बियांची प्रवास करताना खिडकीतून पखरण करत असतं. ही गोड आणि अतिशय सुंदर आठवण त्यांनी शेअर केली आहे. हे त्यांचं सुंदर ‘असणं’ दिसत रहाणार मला प्रत्येक वळणावर असं म्हणतं त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

आशालता ताई ... एकदाच फक्त प्रत्यक्ष भेट झाली, क्वचित एखादा फोन.. कालपासूनच जीव हळहळत होता आज पहाटे बातमी आली.. त्यांचा इथला प्रवास संपला. त्यांची कारकीर्द,वागण्याबोलण्यातलं मार्दव आठवत राहील.. दिसणं होतंच सुंदर पण, त्यांच्या पर्समधल्या चिमुकल्या पुड्या..विविध बियांच्या..रोज कुठल्या कुठल्या भाजीच्या, फळांच्या बिया जमवून,साफ करुन, निगुतीनं त्यांच्या पुड्या करुन पर्समधे बाळगायच्या आशालता ताई! आयुष्यात जो काही प्रदीर्घ प्रवास केला त्यांनी..खिडकीतून या बियांची पखरण करत!! हे त्यांचं सुंदर ‘असणं’ दिसत रहाणार मला प्रत्येक वळणावर

A post shared by Shubhangi Gokhale (@shubhangi.gokhale.18) on

आशालता यांनी आतापर्यंत १०० हून अधिक मराठी आणि हिंदी सिनेमांत काम केलं आहे. आपल्या अभिनयातून तर त्या कायमच साऱ्यांच्या लक्षात राहतील. पण त्यांच्या या छोट्याशा सवयीतून त्या कायमच असंख्य वृक्षांच्या रुपाने आठवणीत राहतील. 'मरावे परी किर्तीरुपे उरावे' अगदी याप्रमाणेच आशालता यांचं हे काम आहे. 

आशालता यांच्या जाण्याचं दुःख प्रत्येक कलाकाराला आहे. कोरोनाच्या काळात ज्येष्ठ कलाकारांना सेटवर येण्यास परवानगी नव्हती. नंतर राज्यसरकारने निर्णयात बदल करून ६० वर्षांच्यावरील कलाकाराला सेटवर येण्यास परवानगी देण्यात आली.मात्र, आता सरकारचा हा निर्णय योग्य की अयोग्य असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे?