मुंबई : बायोपिकच्या ट्रेंडमध्ये पदार्पण करत आपल्या अभिनयाचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांपर्यंत आणण्यासाठी सज्ज झालेली अभिनेत्री रिचा चड्ढा ही पुन्हा एकदा तिच्या एका मुलाखतीमुळे आणि वक्तव्यामुळे प्रकाशझोतात आली आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री, अडल्ट स्टार, शकीलाच्या आयुष्यावर साकारल्या जाणाऱ्या चित्रपटाच्या निमित्ताने 'आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तिने एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित केली आहे.
अडल्ट स्टारला पॉर्न स्टार म्हणून संबोधणं, ओळखणं हे आपल्या पुरुषप्रधान समाजाचं वर्चस्व असल्याचंस सिद्ध करत असल्याचं ती म्हणाली.
'अडल्ट चित्रपट अभिनेता, अभिनेत्रीला पॉर्न स्टार म्हणणं हे आपल्या समाजाचं पितृसत्ताक असण्याचं चिन्हंच आहे. मुळात हे चित्रपट पाहिलेही जातात आणि तितकेच यशस्वीही ठरतात. याला म्हणायचं तरी काय?', असं ती म्हणाली.
अडल्ट चित्रपट साकारले जातात कारण त्यांना मिळणारा प्रतिसादही तिकाच लक्षवेधी असतो ही बाबही तिने अधोरेखित केली. शकीलाच्या जीवनावर आधारित चित्रपटाची टॅगलाईनच 'नॉट अ पॉर्न स्टार' अशी असल्यामुळे त्यातूनही बऱ्याच गोष्टी स्पष्ट होत आहेत.
शकीला यांना इतर लोकांकडून काय संबोधलं जायचं हा मुद्दा नाही. अनेकांनी त्यांचे चित्रपट पाहिले, त्यांचा पॉर्नस्टार म्हणून संबोधलं, पण मुळात त्या तशा नव्हत्याच. त्यामुळे या चित्रपटातून आता त्यांची कधीही न पाहिलेली बाजू आणि आयुष्याचा प्रवास प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तेव्हा आता त्यांच्यावर लावण्यात आलेलं हे विशेषण खरंच योग्य आहे का, हे प्रेक्षकांनी चित्रपट पाहूनच ठरवावं', असं रिचाने स्पष्ट केलं.
रिचाची मुख्य भूमिका असणाऱ्या या बायोपिकच्या माध्यमातून एका व्यक्तीमत्त्वाचीच ओळख होणार नसून दाक्षिणात्य आणि त्यातूनही मल्याळी संस्कृतीचं सुरेख दर्शनही प्रेक्षकांना होणार आहे. त्यामुळे कित्येक वर्षांपासून उत्तर भारतीय संस्कृतीची झलक पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी यावेळी दाक्षिणात्य संस्कृती पाहण्याची परवणी असणार असल्याचंही तिने स्पष्ट केलं.