चार आठवड्यांनंतरही 'कबीर सिंग'ची धमाकेदार कमाई सुरुच; आकडे पोहोचले....

शाहिद कपूरची मुख्य भूमिका असणारा चित्रपट 'कबीर सिंग' प्रदर्शित होऊन जवळपास चार आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. 

Updated: Jul 19, 2019, 01:04 PM IST
चार आठवड्यांनंतरही 'कबीर सिंग'ची धमाकेदार कमाई सुरुच; आकडे पोहोचले.... title=

मुंबई : शाहिद कपूरची मुख्य भूमिका असणारा चित्रपट 'कबीर सिंग' प्रदर्शित होऊन जवळपास चार आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. असं असलं तरीही या चित्रपटाची लोकप्रियता, प्रेक्षकांमध्ये असणारी उत्सुकता मात्र कमी झालेली नाही. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'सुपर ३०' या हृतिक रोशनची मुख्य भूमिका असणाऱ्या चित्रपटाचाही 'कबीर सिंग'च्या कमाईवर काहीच परिणाम झालेला नाही.  

शाहिद कपूर आणि किआरा अडवाणी यांच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत २६० कोटींची कमाई केली आहे. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर हेच आकडे ३५० कोटींच्या घरात पोहोचले आहेत.

सलमान खानची मुख्य भूमिका असणाऱ्या भारत आणि विकी कौशलची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटांनाही कबीर सिंगने कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा कबीर सिंग अनेकांनाच थक्क करत आहे. 

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली. संदीप वंगा दिग्दर्शित कबीर सिंग हा चित्रपट अर्जुन रेड्डी या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. ज्यामध्ये 'कबीर सिंग' या पात्राला प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळत आहे. परिणामी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता शाहिद कपूर याच्या चित्रपट कारकिर्दीला एक नवं आणि यशस्वी वळण मिळालं आहे.