Shahid Kapoor on Kabir Singh : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटानं पहिल्या दिवशी 6 कोटी 7 लाख रुपयांचा बिझनेस केला आहे. त्यानंतर दुसऱ्यादिवशी जर कमाईचा आकडा पाहिला तर 9 कोटी 50 लाख पर्यंत पोहोचला होता. आता आशा आहे की रविवारी प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करतील. शाहिद कपूर गेल्या काही काळापासून असे काही चित्रपट करताना दिसतोय, ज्या भूमिका कधी तो करेल असे त्याच्या चाहत्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. शाहिद कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'कबीर सिंह' नंतर तो प्रेक्षकांना पाहायला काय आवडेल ते करण्याचा प्रयत्न करतो असं म्हटलं आहे.
शाहिद कपूरनं ही मुलाखत क्विंट नियॉनला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत म्हटलं की कबीर सिंहसाठी मला खूप प्रेम मिळालं आणि खूप क्रिटिसिज्म देखील मिळालं. शाहिद कपूरनं म्हटलं की 'कबीर सिंहनंतर मला ही गोष्ट जाणवली की मला क्रिटिक्ससाठी चित्रपट बनवायचे नाही, त्याशिवाय अवॉर्ड्स मिळावे म्हणून मला चित्रपट करायचे नाही, मला फक्त प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवायचे आहेत.'
पुढे शाहिदनं सांगितलं की मला वाटतं की एक अभिनेता किंवा एक क्रिएटिव्ह व्यक्तीला हे माहित हवं की 'कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचे आहे. नाही तर, हे, ते आणि त्यासोबत एकत्र सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असताना तुमचं एका गोष्टीवर लक्ष राहत नाही आणि यामुळे संतुलन बिघडतं. एकदा तुम्हाला तो सेंटर सापडला की तुम्हाला समतोल राखता येईल. त्या समतोलामुळे तुम्हाला नक्कीच सन्मानित करण्यात येतो. कबीर सिंहनं माझ्यासाठी हेच केलं.'
हेही वाचा : पवन कल्याणच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग! 12 वर्ष जुन्या चित्रपटाच्या री-रिलीजन केला धिंगाना
शाहिद कपूरच्या 'कबीर सिंह' चित्रपटातील भूमिकेवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. मात्र, तरी सुद्धा या चित्रपटानं चांगली कमाई केली होती. या चित्रपटातील भूमिकेविषयी शाहिद कपूर म्हणाला की 'मला कधीच वाटलं नाही की कबीर एक व्यक्ती म्हणून चांगला होता. त्याला त्याचं प्रेम मिळालं पण त्याला त्याचाही त्रास होऊ लागला. याच गोष्टी बघण्यासारख्या असतात. कबीर सिंह ही एक वाईट भूमिका होती आणि हे आम्ही सुरुवातीपासून बोलतोय.'