ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन

एक हरहुन्नरी अभिनेता गमावला 

Updated: Mar 17, 2020, 09:57 AM IST
ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन  title=

पुणे : ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं पुण्यात निधन झालं आहे. वयाच्या ८८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक मराठी सिनेमांमध्ये महत्वाच्या भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारल्या आहे. 
मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. 'चल रे लक्ष्या मुंबईला', 'खट्याळ सासू नाठाळ सून', 'खरं कधी बोलू नये', 'माझा पती करोडपती', 'अशी ही बनवाबनवी', 'रंगत संगत', 'थरथराट', 'भुताचा भाऊ', 'नवरा बायको', 'माल मसाला', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' इत्यादी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. मराठी कलासृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती.

मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. यामध्ये 'खट्याळ सासू नाठाळ सून', 'माझा पती करोडपती', 'अशी ही बनवाबनवी', 'थरथराट', 'भुताचा भाऊ', 'दे दणादण', 'आयत्या घरात घरोबा', 'धुमधडाका', 'झपाटलेला' अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.

जयराम कुलकर्णींचा परिचय 

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावी त्यांचा जन्म झाला. या गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच श्रीकांत मोघे, शरद तळवलकर यांच्याशी मैत्री झाली. पुढे १९५६ साली आकाशवाणी पुणे केंद्रात नोकरी केली. जयराम यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.  शाळेत असल्यापासूनच जयराम यांना अभिनयाची आवड असल्यामुळे इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची मावशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली होती.

मराठी सिनेदिग्दर्शक अनंतराव माने यांनी जयराम यांना पहिल्यांदा चित्रपटात काम दिले. कोल्हापूर आणि मुंबई येथे चित्रीकरण असल्याने अभिनयाची आवड आणि नोकरी संभाळताना अनेकदा जयराम यांची तारेवरची कसरत व्हायची. अनेकदा त्यांच्या नोकरीतील रजा संपायच्या. त्यामुळे १९७० च्या सुमारास जयराम यांनी आकाशवाणीच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि अभिनय श्रेत्राकडे वळले. आकाशवाणीमुळे त्या वेळचे मोठ-मोठे कलाकार आणि साहित्यिकांशी जयराम यांची ओळख झाली होती