मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या 34व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या निधनानंतर त्याचे चाहते त्याला न्याय मिळवून देण्याची मागणी करत आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड आणि टीव्ही जगतात मोठी निराशा असून अनेक सेलिब्रिटी त्याच्या आठवणींना उजाळा देत, सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. सुशांतचा जवळचा मित्र संदीप सिंहनेही सोशल मीडियावर एक पोस्ट करत, अंकिता आणि सुशांतच्या नात्याबद्दल काही गोष्टी लिहिल्या आहेत.
संदीप सिंहने लिहिलेल्या पोस्टमध्ये, अंकिताच सुशांतला वाचवू शकत होती, असं म्हटलंय. त्याशिवाय या पोस्टमध्ये संदीपने त्या दोघांच्या नात्याबाबत अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. सुशांत, अंकिता आणि संदीप यांची मैत्री, त्यांच्या मैत्रीतील अनेक गमतीजमतीही त्याने शेअर केल्या आहेत.
14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने त्याच्या वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांत गेल्या 6 महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. याच नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.