जोधपूर : प्रसिद्द काळवीट प्रकरण तर तुम्हाला माहितीच असेल, या प्रकरणात बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचं नाव समोर आलं होत. या प्रकरणी कोर्टात सुनावणी पार पडली. सलमानला या प्रकरणात शिक्षाही झाली, सध्या तो जामीनावर बाहेर आहे. इतकं सर्व होऊन हे प्रकरण मिटलं असेल असे जर तुम्हाला वाटतं असले तर, असं खऱचं झालं नाहीए. कारण आता गावकऱ्यांनी थेट हत्या झालेल्या त्या काळविटाचा पुतळाचं उभारलाय. या पुतळ्याचा फोटो आता व्हायरल होत आहे. नेमका पुतळा का उभारण्य़ात आलाय ते जाणून घेऊयात.
काळवीट प्रकरण काय?
जोधपूरमध्ये हम साथ साथ है या सिनेमाचे शूटिंग सुरु होते. या सिनेमा दरम्यान सलमान खान, सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम व इतर कलाकारांनी काळविटाची शिकार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सलमान असल्याचं समोर आल होतं. यामुळेचं गेल्या 20 वर्षांपासून या प्रकरणात जोधपूर कोर्टात त्याला साऱखी हजेरी लावावी लागते. या प्रकरणात अखेरीस त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र सध्या तो जामिनावर बाहेर आहे.
बिश्नोई समाजाचा पुढाकार
काळवीट शिकार प्रकरणात बिश्नोई समाजाने कोणत्याही दबावाला न झुकता मोठा लढा दिला होता. त्यानंतर आता याच समाजाने मोठा निर्णय घेतला आहे. बिश्नोई समाजाने समाजाने या स्मारकासाठी जमीनही दिली आहे. कांकाणी युवा नावाने एक ग्रुप स्थापन करण्यात आला. यामध्ये एकही लोकप्रितनिधी नाही. या ग्रुपने मिळून हा निर्णय़ घेतलाय. त्यानुसार ज्या ठिकाणी हरणाला दफन करण्यात आले होते त्या जोजरी नदीच्या किनारी 7 बिघा जमीनीवर त्याचे स्मारक बांधण्यात येतेय.
कसा असणार पुतळा?
कांकाणी गावात उभे राहत असलेल्या या स्मारकासाठी काळ्या हरणाचा पुतळा तयार झालेला आहे. हा पुतळा सिमेंट आणि लोखंडाच्या सहाय्याने तयार करण्यात आला आहे. या पुतळ्याचे वजन सुमारे 800 किलोच्या जवळपास आहे. जोधपुरातील सिवांची गेट येथील रहिवासी मूर्तीकार शंकर यांनी हा पुतळा अवघ्या 15 दिवसांत तयार केला आहे.
म्हणून घेतला स्मारकाचा निर्णय
बिश्नोई समाजात काळ्या हरणाबाबत प्रचंड श्रद्धा आहे. त्यामुळेच आता काळविटाच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक तयार करण्यात येते आहे. या परिसरात वन्यजीवांच्या विशेष करुन हरणांच्या सुटकेसाठी रेस्क्यू सेंटरही तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या हरणाला सलमानने मारलं होत, त्यांच हरणाचं स्मारक बनत असल्याने काळविट प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.