Oscars2020 : ...म्हणून 'पॅरासाईट' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

ही कारण एकदा वाचाच... 

Updated: Feb 10, 2020, 11:26 AM IST
Oscars2020 : ...म्हणून 'पॅरासाईट' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट  title=
parasite

मुंबई : यंदाच्या वर्षी ऑस्कर पुरस्कारांमध्ये विविध विभागांमध्ये ‘वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड’, 'द आयरिश मॅन’ आणि ‘१९१७’ या चित्रपटांना Oscars2020मध्ये नामांकनं मिळाली होती. यामध्ये दक्षिण कोरियातील ‘पॅरासाईट’ या परभाषीय चित्रपटाच्या कामगिरीकडे संपूर्ण चित्रपट जगताच्या नजरा लागलेल्या होत्या. अखेर सर्व अपेक्षा सार्थ ठरवत 'पॅरासाईट'ने Oscars 2020मध्ये बाजी मारली. 

सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागातील पुरस्कार प्रदान करण्यासाठी म्हणून And the Oscar goes to.... असं म्हणत 'पॅरासाईट'चं नाव जाहीर झालं आणि डॉल्बी थिएटरमध्ये एक नवा इतिहास रचला गेला. 'पॅरासाईट'ची नेटकऱ्यांपासून चित्रपट विश्वात सक्रीय असणाऱ्या दिग्गजांपर्यंत सर्वत्रच चर्चा होती. हा चित्रपच सर्वोत्तम ठरण्यामागे फक्त या चर्चाच नव्हे, तर असंख्य कलाकारांची मेहनत, दमदार पटकथासुद्धा तितकीच जबाबदार ठरली. 

ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत असलेला 'पॅरासाईट' हा मुळचा कोरियन चित्रपट. हॉलिवूड कलासृष्टीत दिग्गजांनी तयार केलेल्या चित्रपटांच्या शर्यतीत यंदाच्या ९२व्या ऑस्करच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका बिगरइंग्रजी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या विभागात उतरवलं.

वाचा : Oscars 2020 : ऑस्कर पुरस्काराच्या विजेत्यांची संपूर्ण यादी 

बाँग जून हो यांनी मांडलेली किम या कुटुंबाची ही कथा. रोजंदारीवर जगणारं हे कुटुंब पार्क्स यांच्या घरामध्ये विविध क्लुप्त्या वापरून शिरकाव करतं. त्याच वेळी कर्जदारांना चुकवण्यासाठी घराच्या तळघरात लपून बसलेल्या आपल्या नवऱ्याला शोधण्यासाठी आधी घरकाम करणारी महिला येते आणि त्यातून त्या घरात प्रचंड नाट्य घडतं. अतिशय थक्क करणारी ही ब्लॅक कॉमेडी जगभरातील रसिकांसोबत समीक्षकांनाही तितकीच भावली. 

विविध चित्रपट महोत्सवांमध्येही या चित्रपटाचा गौरव करण्यात आला. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पाम डी ओर पुरस्कारही 'पॅरासाईट'लाच मिळाला होता. त्यात आता ऑस्करमध्ये संपादन केलेलं यश पाहता सर्वोत्कृष्ट चित्रपट या बहुमानाने गौरवण्याच आलेला हा पहिला बिगर इंग्रजी चित्रपट ठरला आहे.