मालिका पाहून कृष्णवर्णीय रंगाच्या मुलाशी लग्न करण्याचा घेतला निर्णय

100 भागांच्या सेलिब्रेशनसाठी देण्यात आलं खास आमंत्रण

Updated: Feb 29, 2020, 12:22 PM IST
मालिका पाहून कृष्णवर्णीय रंगाच्या मुलाशी लग्न करण्याचा घेतला निर्णय title=

मुंबई : मालिकांचा प्रभाव प्रेक्षकांवर पडत असतो. अनेक मालिकांमधून प्रेक्षक काही ना काही शिकत असतो. असाच प्रभाव स्टार प्रवाहवरील 'रंग माझा वेगळा' मालिकेचा प्रेक्षकांवर पडला आहे. 'रंग माझा वेगळा' या मालिकेत वर्णभेदावर भाष्य केलं आहे. कृष्णवर्णीय रंगाच्या मुलीशी लग्न करायला सहसा कुणी तयार होत नाही. हा वर्णभेद मिटवून टाकण्यासाठी मालिकेतून प्रयत्न केले जात आहेत. असं असताना या मालिकेचा सकारात्मक प्रभाव आजच्या पिढीवर पडताना दिसत आहे. 

वर्णभेदावर भाष्य करणारी ही मालिका पाहून यवतमाळ येथील राणी भुते ही युवती प्रेरीत झाली आणि तिने कृष्णवर्णीय रंगाच्या मुलाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. व्यवसायाने कॉम्प्युटर इंजिनीअर असणारी 27 वर्षांची राणी 'रंग माझा वेगळा' मालिकेची चाहती आहे. वर्ण भेदावर भाष्य करणारा मालिकेचा विषय आणि दिला जाणारा संदेश राणीला मनापासून पटल्यामुळेच तिने अनुराग मिसाळ यांच्याशी लग्न करण्याचं ठरवलं आणि तिला या निर्णयात कुटुंबाचीही साथ मिळाली. मालिकेत कार्तिक ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या आशुतोष गोखलेशी राणी यांनी संपर्क साधला. मालिकेला नुकतेच 100 भाग पूर्ण झाले या निमित्ताने या जोडप्याला सेटवर बोलवण्यात आलं होतं. 'रंग माझा वेगळा'च्या संपूर्ण टीमने त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या अनोख्या अनुभवविषयी सांगताना आशुतोष गोखले म्हणाला, जो विषय पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय याचा आनंद आहे. मालिकेमुळे मतपरिवर्तन होत असेल तर ही खूप महत्त्वाची बाब आहे. या प्रसंगामुळे आम्ही सर्वच खूप भारावून गेलोय.