नवी दिल्ली : सध्या लॉकडाऊनच्या काळात सिनेमागृह बंद असताना तसेच सिरियलचं शूटींग देखील बंद असताना रामायण ही सर्वाधिक पाहीलेली गेलेली मालिका ठरली आहे. बार्कचा १६ व्या आठवड्याच्या रिपोर्टमध्ये रामायण मालिका टॉपला आहे. रावणाचा वध झाल्यानंतर उत्तर रामायण दाखवले जात असून ते देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. तर दुसरीकडे महाभारताच्या टीआरपीवर परिणाम झालेला पहायला मिळतोय. महाभारत मालिकेचा टीआरपी घटलेला दिसत आहे.
रामायण टीआरपीमध्ये नंबर एक वर आहे. राम-रावण युद्ध आणि रामाचे अयोध्येला परतण्या दरम्यानचा हा टीआरपी आहे. सोबतच या मालिकेला ६८ हजार ६८७ इम्प्रेशन मिळाले आहेत. रामापासून वेगळे होणाऱ्या लव कुश यांची कहाणी लोकांना आवडतेय. रामायण आणि उत्तर रामायण हे पहिल्या दोन स्थानी असल्याने महाभारत तिसऱ्या नंबरवर गेले आहे. पुढच्या आठवड्यातील टीआरपीमध्ये महाभारत पुढे गेले असेल अशी या मालिकेचे चाहते आशा व्यक्त करत आहेत.
शनिदेव मालिकेचा टीआरपी देखील कमी झालेला दिसला. चौथ्या नंबरवरुन हटून ही मालिका पाचव्या स्थानी आहे. रामायणाने देशातच नव्हे तर परदेशातही रेकॉर्ड बनवला आहे. रामायण ही जागतिक स्तरावर पाहीली जाणारी मालिका ठरली आहे.
जवळपास 17 मार्चपासून सर्व मालिका, चित्रपटांचं शूटिंग बंद आहे. त्यामुळे टीव्हीवर कोणत्याही मालिकेचे नवे भाग प्रसारित होत नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांकडून टीव्हीवर 'रामायण' पुन्हा प्रसारित करण्याची मागणी करण्यात येत होती. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने लॉकडाऊन काळात 'रामायण' मालिका पुन्हा टीव्हीवर प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 28 मार्चपासून लोकाग्रहास्तव 'रामायण' प्रसारित होण्यास सुरुवात झाली.
रामायण, महाभारत यांसारख्या पौराणिक मालिकांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. दररोज सोशल मीडियावर 'रामायण'च्या एपिसोडची, दृश्यांची चर्चा होत आहे. रामायण पुन्हा प्रसारित झाल्यानंतर मालिकेतील प्रमुख कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
रामानंद सागर यांनी वाल्मिकींच्या रामायण आणि तुलसीदास यांच्या रामचरितमानसवर आधारित या मालिकेचे एकूण 78 भाग केले होते.
देशात प्रथमच ही मालिका 25 जानेवारी 1987 ते 31 जुलै 1988 पर्यंत प्रसारित झाली. दर रविवारी सकाळी 9.30 वाजता टीव्हीवर हा कार्यक्रम प्रसारित होत होता.
1987 ते 1988 पर्यंत 'रामायण' जगातील सर्वाधिक पाहिली गेलेली मालिका ठरली. जून 2003 पर्यंत ही मालिका जगातील सर्वाधिक पाहिली गेलेली पौराणिक मालिका म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली होती.