मुंबई : काही दिवसांपूर्वी लेखिका तस्लिमा नसरीनने ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए.आर.रहमानच्या मुलीवर निशाना साधला होता. 'जेव्हा सुशिक्षित लोकं हिजाब घालतात तेव्हा मला गुदमरल्यासारखं होतं.' अशा आशयाचं ट्विट नसरीन यांनी केलं होत. त्यांच्या या ट्विटचे सणसणीत उत्तर रहमानची मुलगी खातिजाने दिले आहे. गेल्या वर्षी देखील याच कारणामुळे खातिजाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं.
तेव्हा वडील रहमानने ती समजुतदार आणि मोठी आहे असं म्हणत सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला होता. पण आता खुद्द खातिजाने याविषयावर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणते, 'माझा हिजाब पाहून तुम्हाला जर गुदमरल्यासारखं होत असेल तर तुम्ही मोकळ्या हवेत या. स्त्रीवाद मूळात तुम्हाला कळाचं नाही त्यासाठी तुम्ही सर्च करा. स्त्रीवाद म्हणजे कोणत्याही महिलेचा अपमान करणं नाही.' एकंदर खातिजाने त्यांना स्त्रीवाद म्हणजे नक्की काय? हे सर्च करण्याचा सल्ला दिला.
त्याचप्रमाणे खातिजा म्हणाली, 'एक वर्ष देखील नाही झाला तर पुन्हा या मुद्द्याने डोकं वर काढलं आहे. सध्या देशात अनेक घटना घडत आहेत. पण या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा न करता एक महिला कोणते कपडे घालते यावर सर्वांचे लक्ष आहे.' जेव्हा या विषयांवर चर्चा होते तेव्हा मला फार राग येतो असं खातिजाने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
लेखिका तस्लीमा नसरीन यांनी एक फोटो ट्विट केला होता. यामध्ये त्यांनी म्हटलंय की,'जेव्हा सुशिक्षित लोकं हिजाब घालतात तेव्हा मला गुदमरल्यासारखं होतं.' तस्लीमाने ट्विट करून लिहिलं की,'मला ए आर रहमान यांचं संगीत खूप आवडतं. पण जेव्हा पण मी त्यांच्या मुलीला बघते तेव्हा मला गुदमरल्यासारखं होतं. 'पारंपरिक विचारांच्या कुटुंबात एक शिकलेली मुलगी कशापद्धतीने ब्रेनवॉश होऊ शकते.'