मुंबई : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत यशाचा शिखर गाठणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या चांगलीच चर्चेत आहे. तब्बल तीन वर्षांनंतर ती 'द स्काय इज पिंक' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये भूमिका साकारणार आहे. आता ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रियांका नेहमी तिच्या पतीसोबत सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असते. नुकताच निक जोनस बद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लहान असताना निक प्रचंड आजारी पडला होता आणि तो कोमात जाण्याच्या मार्गावर होता.
खुद्द निकने यासंबंधतीत खुलासा केला आहे. 'सिगार एफिकियोनाडो' मॅगझीनसोबत संवाद साधताना त्याने सांगितले, 'मी फार लहान होतो तेव्हा मला मधुमेहाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. माझ्या आई-वडिलांच्या लक्षात आले की, माझे वजन कमी होत आहे. त्याचप्रमाणे शरीरात साखरेचे प्रमाण देखील वाढत होते.' असं तो म्हणाला.
तेव्हा त्याला मधुमेह टाइप १ असल्याचे कळाले होते. अवघ्या वयाच्या १३व्या वर्षी तो मधुमेहाचा शिकार झाला होता. त्यानंतर त्याने स्वत:च्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले. आणि मधुमेहावर मात केली. निकच्या या स्पष्टीकरणानंतर तो चांगलाच चर्चेत आला आहे.