'तिने पिण्याचे व्यसन...', पूनम पांडेच्या निधनानंतर बॉडीगार्डने केला खुलासा

"मी तिच्या घरीदेखील जाऊन आलो. पण तिथे मला काहीही संशयास्पद आढळले नाही", असे अमिन खानने म्हटले. 

Updated: Feb 3, 2024, 01:05 PM IST
'तिने पिण्याचे व्यसन...', पूनम पांडेच्या निधनानंतर बॉडीगार्डने केला खुलासा title=

प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे निधन झाल्याची बातमी समोर आली होती. पूनम पांडेच्या टीमकडून तिच्या मृत्यूची बातमी देण्यात आली. पूनमच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन यासंदर्भात पोस्ट शेअर करण्यात आली आहे.  2 फेब्रुवारी रोजी सकाळी, इंस्टाग्रामवर एका पोस्टने पूनम पांडेच्या चाहत्यांना धक्का बसला होता. अभिनेत्रीच्या मॅनेजरनेही पूनम पांडेच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. आता पूनम पांडे जिवंत असल्याची माहिती समोर आली आहे. तिने स्वतः इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. 

पूनम पांडेच्या निधनावर तिचा बॉडीगार्ड अमिन खानने प्रतिक्रिया दिली आहे. अमिन हा गेल्या 11 वर्षांपासून पूनमसोबत काम करत आहे. तिच्या निधनाचे वृत्त समजताच त्याला धक्का बसला आहे. त्याने नुकतंच 'ई-टाईम्स'शी बातचीत केली. यावेळी तो म्हणाला, "मला तिचं निधन झालं या वृत्तावर विश्वासच बसत नाही. मी तिच्या बहिणीला फोन लावण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिने याबद्दल कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मला प्रसारमाध्यमाद्वारे तिच्या निधनाचे वृत्त समजले. मी 31 जानेवारीला तिच्यासोबतच होतो. आम्ही रोहित वर्मांसोबत फिनिक्स मिल या ठिकाणी एक फोटोशूटही केले."

"मी तिच्या बहिणीच्या फोनची वाट पाहतोय"

यावेळी अमिनला तिला काही आजार होता का? याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर तो म्हणाला, "ती नेहमी तंदुरुस्त आणि चांगली दिसायची. तिने तिच्या तब्येतीबद्दल कधीही काहीही शेअर केले नाही. मला ती कधीही आजारी आहे किंवा तिला एखादा आजार झालाय असे लक्षण दिसले नाहीत. मी सध्या तिच्या बहिणीच्या फोनची वाट पाहत आहे. ती मला नेमकं काय घडलं हे सांगेल, अशी मला अपेक्षा आहे."

"काहीही संशयास्पद आढळलं नाही"

"मी 2011 पासून तिच्यासोबत आहे. मी प्रत्येक शूटलाही तिच्यासोबत जायचो. काही दिवसांपूर्वी आम्ही एका शूटसाठीच गोव्यात गेलो होतो. पूनम तिच्या तब्येतीची काळजी घ्यायची. तिचा एक वैयक्तिक ट्रेनरही होता. तिने पिण्याचे व्यसनही कमी केलं होतं. मी तिच्या घरीदेखील जाऊन आलो. पण तिथे मला काहीही संशयास्पद आढळले नाही", असे अमिन खानने म्हटले. 

दरम्यान पूनम पांडेचा जन्म 11 मार्च 1991 रोजी कानपूरमध्ये झाला होता. ती एक मॉडेल आणि अभिनेत्री होती. तिने 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नशा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती अखेरची 'द जर्नी ऑफ कर्मा' या चित्रपटात दिसली होती. मॉडेल, अभिनेत्री असणारी पूनम पांडे नेहमीच वादग्रस्त राहिली. कधी आपली विधानं तर कधी बोल्ड कपड्यांमुळे ती नेहमीच वादात अडकली. पूनमने 'खतरों के खिलाडी 13' आणि कंगना रणौतच्या 'लॉकअप' या रिअॅलिटी शोमध्ये झळकली होती.