आई-वडिलांनी इच्छा मारली, आजारांनी वेढलं तरी मानली नाही हार; 'पंचायत'मधील अम्माचा डोळ्यात अश्रू आणणारा संघर्ष

Panchayat Season 3 : 54 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 'पंचायत' आजीबाईंचं स्वप्न पूर्ण... सगळं ठीक असताना फक्त म्हणे, 'अंदर से मन अच्‍छा नहीं लग रहा है!'  

सायली पाटील | Updated: Jun 15, 2024, 03:21 PM IST
आई-वडिलांनी इच्छा मारली, आजारांनी वेढलं तरी मानली नाही हार; 'पंचायत'मधील अम्माचा डोळ्यात अश्रू आणणारा संघर्ष title=
Panchayat Season 3 Who Is Jagmohan Ki Amma aka Abha Sharma

Panchayat Season 3 : 'अॅमेझॉन प्राईमवर' प्रदर्शित झालेल्या 'पंचायत 3' या सीरिजमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी पात्र भेटीला आली आणि पाहता पाहता पुन्हा एकदा जे अपेक्षित होतं ते झालं. अर्थात, या सर्व पात्रांना चाहत्यांच्या मनात आणि घरात हक्काचं स्थान मिळालं. 'सचिव जी' असो, 'प्रधानजी' असो किंवा मग भूषण आणि 'प्रल्हाद चा'.... 'पंचायत'मधील प्रत्येक कलाकारानं त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका अतिशय ताकदीनं साकारत कमाल अभिनय केला. (Amazon Prime)

या सीरिजमध्ये यंदा आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरल्या त्या म्हणजे 'जगमोहन की अम्मा' हे पात्र साकारणाऱ्या 'अम्माजी', म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री आभा शर्मा. 75 वर्षी आभा यांनी त्यांचं हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जवळपास 54 वर्षे प्रतीक्षा केली. त्यांनी साकारलेल्या या भूमिकेमुळं स्वप्नांना वयाची मर्यादा नसते हेच दाखवून दिलं. 

डॉक्टर बनण्याचं होतं स्वप्न ... 

ज्याप्रमाणं सर्वांचीच भविष्यासाठी काही स्वप्न असतात, त्याचप्रमाणं आभा शर्मा यांना फार आधिपासून वैद्यकिय क्षेत्रात शिक्षण घेत डॉक्टर व्हायचं होतं. पण, त्यांच्या कुटुंबीयांनी मात्र या स्वप्नाचा कडाडून विरोध केला. कुटुंबीयांचा विचार करत त्यांचं मन राखण्यासाठी म्हणून आभा यांनी स्वत:च्या स्वप्नाचा त्याग करत शिक्षक होत एक नवी कारकिर्द सुरु केली. 

आता कुठं आयुष्याची घडी बसतेय तोच वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी त्यांच्यापुढं नवं संकट आलं. हिरड्यांना झालेल्या संसर्गामुळं आभा यांनी त्यांचे दात गमावले आणि वयाच्या 45 व्या वर्षी त्यांना एका दुर्धर आजारानं गाठलं, इथं त्या पुरत्या कोलमडल्या. 

आईच्या निधनानंतर अखेर 54 वर्षांनंतर आभा यांनी अखेर त्यांच्या या स्वप्नाचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. वय निघून गेलं होतं पण, आभा यांची जिद्द मात्र कायम होती. त्यांनी अभिनय क्षेत्राकडे वळण्याचं ठरवत एक नवी सुरुवात केली. व्यासपीठावर आभा शर्मा हे नाव चर्चेत आलं आणि त्यांच्या अभिनयाचं कलाजगतातून कौतुक होऊ लागलं. पहिल्याच ऑडिशनमध्ये त्यांची निवड झाली आणि त्यांच्या अभिनयानं पाहणारेही भारावले. 

हेसुद्धा वाचा : चंद्र एकाच जागी स्थिरावणार; तब्बल इतक्या वर्षांनी आकाशात दिसणार भारावणारं दृश्य

काहीशा संकुचित मनानं आभा यांनी मुंबई गाठली आणि पाहता पाहता वाट्याला आलेल्या लहान भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली. टेलिव्हिजन मालिका, चित्रपट आणि सीरिजमुळं आभा नावारुपास येऊ लागल्या. पण, ही तर एक सुरुवात होती. सीरिजविषयी फारशी माहिती नसतानाही आभा यांनी 'पंचायत'साठी ऑडिशन दिली. 10 दिवसांच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी वाढत्या तापमानाची तमा न बाळगता दमदार अभिनय केला. 

चेहऱ्यावर लहान मुलासारखं हसू असणाऱ्या आभा शर्मा त्यांच्या या साधेपणानं आणि अभिनय कौशल्यानं खऱ्या अर्थानं घराघरात पोहोचल्या. वयाच्या 75 मध्ये असणाऱ्या आभा यांना अजून खूप अभिनय करायचा आहे, जीवनातील प्रत्येक क्षण मनसोक्त जगायचा आहे. अशा या पंत्याहत्तरीतील तरुण अभिनेत्रीला प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम पाहून सर्वांनाच त्यांचा हेवा वाटतोय... तुम्ही पाहिली का त्यांनी साकारलेली 'अम्माजी'?