मुंबई : बॉलिवूडमधून फसवणुकीचे अनेक किस्से समोर आले आहेत. आता देखील झगमगत्या विश्वातून एक फसवणुकीच प्रकरण समोर येत आहे. आता अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकी फसवणुकीच्या प्रकरणामुळे चर्चेत आहे. प्रोडक्शन कंपनी 'होली काऊ'ची क्रिएटिव्ह आणि सह-निर्माती मंजू गढवाल यांनी आलिया सिद्दीकीवर फसवणुकीचा आरोप केला आहे. मंजू गढवाल यांचे तब्बल 31 लाख रुपये देण्यास नकार दिल्यामुळे आलिया सिद्दीकी अडचणीत सापडली आहे.
मंजूने 31 लाख रुपये सिनेमाच्या माध्यमातून कमावले होते. जेव्हा मंजू यांनी स्वतःचे पैसे मागितल्यानंतर आलियाने नकार दीला, तेव्हा मंजू यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार मंजूने आलिया सिद्दीकीवर फसवणूक करण्यासोबतच मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
मंजू गढवाल मुलाखतीत म्हणाल्या- 'मी आणि आलिया 2005 पासून मैत्रिणी आहोत. तिला निर्माता बनायचं होतं. आलिया म्हणाली की मी फायनान्सचे काम पाहते आणि तु क्रिएटिव्हचे काम हाती घे. मी कास्टिंग केले, पण त्यांचे चेक बाऊन्स झाले. मंजूने पुढे सांगितले की, आलियाच्या सांगण्यावरून माझ्या वडिलांनीही प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवले.
पुढे मंजू म्हणाल्या, माझे वडील उज्जैन येथील घर विकत असल्याचं आलियाला माहीत होतं. तेव्हा आलियाने घर विकून मिळालेले पैसे वडिलांकडून घेतले आणि एका महिन्यानंतर पैसे परत करेल असं देखील म्हणाली. पण अद्याप तिने पैसे दिलेले नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंजू गढवालकडे हार्ड डिस्क आहे, ज्यामध्ये महत्त्वाची माहिती आहे. माहिती परत मिळवण्यासाठी आलिया आणि मंजू यांच्यात अनेक वाद झाले. आलियाने 22 लाख रुपये देऊन ती हार्ड डिस्क घेतली. मात्र, उर्वरित रक्कम त्यांनी मंजूला दिली नाही.
मंजूने सांगितले की, आलियाला जवळपास 31 लाख रुपये परत करायचे आहेत. मंजूने आलियाविरुद्ध FWICE मध्ये तक्रारही दाखल केली आहे. आता हे प्रकरण पुढे कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.