मुंबई : अतिशय आव्हानात्मक, प्रभावी आणि तितक्याच चौकटीबाहेच्या भूमिकांना न्याय देणाऱ्या कलाकारांना प्रेक्षकांनी आजवर भरभरून प्रेम दिलं आहे. या कलाकारांची यादी तशी बऱ्यापैकी मोठी आहे. पण, सध्याच्या घडीला त्यातल्या त्यात एक नाव घ्यायचं झालं, तर ते आहे अभिनेता आयुषमान खुराना याचं.
'ड्रीम गर्ल' या चित्रपटातून झळकणाऱ्या आयुषमानच्या आगामीच बाला या चित्रपटानेही आतापासूनच सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. पण, एकिकडे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचत असतानाच दुसरीकडे मात्र या चित्रपटाच्या वाटेत काही अडथळे निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळे आयुषमानही अडचणीत आला असावा.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक Praveen Morchhale यांनी मॅडडॉक फिल्म्स, लेखक निरेन भट्ट यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात स्वामित्व हक्क कायदा अर्थात कॉपीराईट ऍक्ट १९५७ अंतर्गत खटला दाखल केला आहे. आयुषमान खुरानाची मुख्य भूमिका असणाऱ्या 'बाला' या चित्रपटाची कथा ही Praveen Morchhale यांनी कलाविश्वातील काही व्यक्तींना ऐकवलेल्या कथानकाशी बरीच मिळतीजुळती आहे.
कमी वयातच टक्कल पडलेल्या एका व्यक्तीची 'बाला' ही कहाणी आहे. याचविषयी आरोप करत Praveen Morchhale यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१५ मध्येच त्यांना याविषयीची कल्पना सुचली होती.
'बॉलिवूड हंगामा'च्या वृत्तानुसार दिग्दर्शकाने या कथेवर जवळपास दोन वर्षे काम केल्यानंतर फिल्म राईटर्स असोसिएशन (एफडब्ल्यूए) अंतर्गत या कथेची रितसर नोंदणी केली होती.
दरम्यान, हा निव्ववळ योगायोग असल्याचं चित्रपटाशी संलग्न व्यक्तींकडून सांगण्यात येत आहे. Praveen Morchhale यांनी या कथेविषयी कलाविश्वातील काही व्यक्तींना सांगितलं असावं, पण दिनेश विजन यांना मात्र याची काही कल्पना नव्हती, असं सांगण्यात येत आहे. थोडक्यात बालाच्या निर्मिती संस्थेकडून चित्रपटाच्या कथेवर सांगण्यात आलेले हक्क आणि करण्यात आलेले आरोप फेटाळण्यात आले आहेत.