न्यू मेक्सिको: अमेरिकेत एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळं सेटवरील एका महिला कलाकाराला जीव गमवावा लागला आहे. 'रस्ट' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ही घटना घडली आहे. जिथं सेटवर अॅलेक बाल्विन (Alec Baldwin) नावाच्या अभिनेत्याच्या बंदुकीतून गोळी झाडली गेली ज्यामुळं तिथे असणाऱ्या सिनेमॅटोग्राफरचा मृत्य झाला. या दुर्घटनेमध्ये दिग्दर्शकही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
युएस लॉ एन्फोर्समेंटमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा सेट न्यू मेक्सिकोमधील सांता फी काऊंटी येथे लावला होता. जिथं गुरुवारी ही घटना घडली. या घटनेमध्ये 42 वर्षीय हलिना हचिन्स यांना जीव गमवावा लागला. तर, 48 वर्षीय लेखक- दिग्दर्शक जोएल सूजाही जखमी झाले. सध्यातरी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
बंदुक लोड असल्याची कल्पना नव्हती....
प्राथमिक तपासणीतून समोर आलेल्या माहितीप्रमाणं चित्रीत करण्यात येणाऱ्या एका दृश्यासाठी बंदुकीचा वापर करण्यात आला होता. नेमकी बंदुक लोड झालीच कशी याचाच शोध आता पोलीस घेत आहेत. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार अॅलेक बाल्डविनच्या माहितीनुसार बंदुक हातात घेतल्यावरही ती लोड असल्याची आपल्याला पुसटशीही कल्पना नव्हती असं त्याचं म्हणणं आहे.
एकिकडे या प्रकरणीचा तपास सुरु असतानाच या दुर्घटनेमध्ये मारल्या गेलेल्या हलिना हचिन्स यांना लोकांनी श्रद्धांजली देण्यात सुरुवात केली आहे. कलाकारांनीही हचिन्स यांना श्रद्धांजली देत झाल्या प्रकरणाबाबत दु:ख व्यक्त केलं आहे.