मुंबई : अभिनेत्री मयुरी देशमुख सध्या तुफान चर्चेत आली आहे. जुलै 2020 मध्ये मयुरी देशमुखचा नवरा अभिनेता आशुतोष भाकरेने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. आज आशुतोष भाकरेचा वाढदिवस आहे. पतीच्या वाढदिवसाचं निमित्त साधत मयुरीने एक कविता सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. पतीच्या मृत्यूनंतर त्या धक्क्यातून बाहेर येणं मयुरीसाठी फार कठीण होतं. पण आज नवऱ्याचा वाढदिवस असल्यामुळे तिने जुन्या आठवणी ताज्या करत अशुतोषसाठी एक भावूक कविता पोस्ट केली आहे. सध्या मयुरीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री मयुरी देशमुख मराठीसोबतच आता हिंदीत रुळू लागली आहे. 'इमली' या मालिकेतील तिच्या कामाचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे. मयुरीने 'ग्रे' आणि 'लग्न कल्लोळ' या दोन चित्रपटांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. सांगायचं झालं तर अशुतोषच्या आत्महत्येनंतर मयुरी मोठ्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
का केली आशुतोषने आत्महत्या?
आशुतोषला मोठ्या बॅनरची कामे मिळत नसल्याने त्याला नैराश्य आले होते. मुंबईतील मानसोपचार तज्ज्ञांचा सल्लाही त्याने घेतला होता. आशुतोष साडे चार वर्षांपासून मुंबईत राहत होता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागील महिन्यात तो नांदेडला आपल्या आई-वडिलांकडे गेला.
गेल्या चार महिन्यांपासून कोणतंही काम नव्हतं. काही दिवसांपासून तो नैराश्यातच होता. या अनुषंगाने तो उपचारही घेत होता. मात्र त्याने या दरम्यान अचानक मृत्यूला कवटाळले. लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकारांनी नैराश्यातून आत्महत्या केली. कलाकारांना काम न मिळणं ही गोष्ट अधिक मनाला लागते त्यामुळे असे प्रकार घडत होते.