Sayali Sanjeev on Siddharth Chandekar : छोट्या पडद्यावरील 'काहे दिया परदेस' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखले जाते. या मालिकेमुळे तिला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेनंतर सायली संजीवने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. 'पोलीस लाईन' हा तिचा पहिला चित्रपट होता. सध्या सायली ही 'ओले आले' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान तिने सिद्धार्थ चांदेकरसोबतच्या मैत्रीबद्दल भाष्य केले.
सायली संजीवची मुख्य भूमिका असलेला 'ओले आले' हा चित्रपट 5 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटात ती अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबरोबर झळकत आहे. या चित्रपटापूर्वी सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीवने 'झिम्मा 1' आणि 'झिम्मा 2' या चित्रपटात काम केले आहे. आता 'ओले आले' या चित्रपटाच्या निमित्ताने सायली आणि सिद्धार्थने 106.4 या रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. यावेळी तिला सिद्धार्थसोबतच्या मैत्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सायलीने "मला याचा कंटाळा आलाय. मला सिद्धार्थचं तोंड बघून कंटाळा आलाय", असे गंमतीत म्हटले.
त्यापुढे ती म्हणाली, "खरं तर मला त्याचे खूप कौतुक करायचं आहे. मला ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन जे म्हणायचं आहे, ते त्याला सांगायची वेळ कधीच येत नाही. सिद्धार्थला मी ऑनस्क्रीन काय प्रतिक्रिया देणार आहे, तेही कळतं आणि मी ऑफस्क्रीन काय प्रतिक्रिया देणार हेही कळतं. आमच्या दोघांचं बॉन्डिंग खूप वेगळं आहे. 2023 मध्ये आम्हाला भेटून 10 वर्ष पूर्ण झाली. सिद्धार्थची चाहती असल्यापासून त्याची घट्ट मैत्रीण होण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. मी जेव्हा सुरुवातीला सिद्धार्थला भेटले तेव्हा मी त्याची चाहती होते आणि आता मी त्याची घट्ट मैत्रीण आहे."
"आमच्या मैत्रीचा आम्हाला झिम्मा 2 मध्ये खूप फायदा झाला. 'ओले आले' या चित्रपटात आम्ही दोघांनी एकत्र काम केलं असलं तरी एकमेकांच्या विरुद्ध काम केलं आहे. सिद्धार्थ हा कधीच फक्त कौतुक करत नाही. तो मी कुठे चुकतेय हे सांगतो. मी आता काय केलं पाहिजे, हेही तो सांगतो. 'ओले आले' या चित्रपटात जर मी तुम्हाला आवडले तर त्याचं काही अंशी श्रेय हे सिद्धार्थला आहे, कारण त्याने मला कसं काम केलं पाहिजे हे सांगितलं आहे. तो लाडाने मला पपी म्हणून आवाज देतो", असेही सायलीने सांगितले.
दरम्यान सायली संजीवने आतापर्यंत मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. 'काहे दिया परदेस' या मालिकेद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'परफेक्ट पती', 'शुभमंगल ऑनलाईन' या मालिकांमध्ये झळकली. त्याबरोबरच सायली ही 'बस्ता', 'गोष्ट एका पैठणीची', 'हर हर महादेव', 'फुलराणी', 'उर्मी' या चित्रपटात झळकली. तसेच 'झिम्मा', 'झिम्मा 2' या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. आता सध्या ती 'ओले आले' या चित्रपटात झळकत आहे.