Rupali Gaykhe on Instagram followers : मराठी सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकारांना कधी ना कधी ऑडिशन द्यावी लागते. पण आता ऑडिशनची पद्धत बदलली आहे. पूर्वी एखाद्या कलाकाराची निवड ही त्याची योग्यता पाहून केली जायची. पण आता सोशल मीडिया फॉलोवर्सचा आकडा पाहून कलाकाराची निवड करण्यात येत आहे, असा धक्कादायक खुलासा एका अभिनेत्रीने केला आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मालिकाविश्वातील सध्याच्या धक्कादायक परिस्थितीबद्दल व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावेळी तिने घडलेल्या सर्व प्रसंगाबद्दल खंतही व्यक्त केली आहे.
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून रुपाली गायखेला ओळखले जाते. रुपाली गायखे ‘ग्रहण’, ‘छत्रीवाली’, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’, ‘संत गजानन शेगावीचे’ यासारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली. गेल्या कित्येक वर्षांपासून ती मराठी मालिकेत झळकत आहे. आता तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रुपालीने तिला आलेल्या एका धक्कादायक अनुभवाबद्दल भाष्य केले आहे.
या व्हिडीओत रुपाली म्हणाली, "नमस्कार, मला आज तुम्हाला सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी गेल्या कित्येक वर्षांपासून मी मराठी सिनेसृष्टीत काम करत आहे. पण मी इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा ट्विटर यासांरख्या सोशल मीडियावर जास्त सक्रीय नसेत. मला कायमच एक अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर येणे आवडते. पण आता सर्वच उलटं झालं आहे. मी आज एका मीटिंगसाठी गेले होते. त्यावेळी मला समोरच्या लोकांनी तुमचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स किती आहेत? असा प्रश्न विचारला. मी सोशल मीडियावर सक्रीय नसल्याने माझे इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स जास्त नव्हते. मी जास्त पोस्ट, रिल्स आणि व्हिडीओ शेअर करत नाही. त्यामुळे माझे जेमतेम 2 हजार फॉलोअर्स आहेत, असं मी त्यांना सांगितलं."
"मी आज जवळपास 13 ते 14 वर्षे सिनेसृष्टीत काम करतेय. पण, शेवटी इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या आधारे तुम्हाला काम मिळणार की नाही, हे ठरतं. मला जर या गोष्टी आधीच माहिती असत्या, तर सुरुवातीपासूनच काम न करता मी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत बसले असते. मला याबाबतीत कोणालाही वाईट बोलायचं किंवा ठरवायचं नाही. आज जे लोक सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत ते सुद्धा प्रचंड मेहनत करतात याची मला कल्पना आहे. पण, मला फक्त प्रेक्षकांना एकच गोष्ट विचारायची आहे ती म्हणजे कलाकारांचे मोठ्या प्रमाणात इन्स्टाग्राम फॉलोअर्स असणं ही गोष्ट इंडस्ट्रीत काम करण्यासाठी महत्त्वाची आहे का?", असा प्रश्न रुपालीने उपस्थित केला आहे.
"त्यामुळे आता मी माझ्या चाहत्यांना प्रश्न विचारु इच्छिते तो म्हणजे गेल्या 13 ते 14 वर्षांपासून मी जे काम केलंय, त्या आधारे मला काम मिळायला हवं की माझे इन्स्टाग्राम फॉलोअर्स पाहिले पाहिजेत?" असेही रुपालीने म्हटले आहे. दरम्यान रुपालीच्या या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. त्यावर अनेकांनी घडलेल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.