Squid Game : दक्षिण कोरियन सिरीज स्क्विड गेमने कोविड काळात जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवली होती. ही सिरीज आल्यानंतर काही दिवसातच ती नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या शोपैकी एक बनली होती. या सीरिजमधील प्रत्येक पात्राने खूप प्रसिद्धीही मिळवली. या थ्रिलर सीरिजमधील प्लेअर नंबर 1 ची भूमिका साकारणाऱ्या 79 वर्षीय अभिनेता ओह येओंग-सू याने साकारली होती. मात्र, आता या लोकप्रिय अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
अभिनेता ओह येओंग-सू यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आता तो तुरुंगात जाणार आहे. ज्यावर्षी 'स्क्विड गेम' ही सीरिज आली तेव्हाच एका महिलेने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे आता या अभिनेत्याचे खरं रुप समोर आल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. 'स्क्विड गेम' मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकणारा ओह येओंग-सू याला लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे असून त्याला आठ महिन्यांची शिक्षाही झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने अभिनेत्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. याबाबत सुवॉन जिल्हा न्यायालयाच्या सेओंगनाम शाखेने सांगितले की, अभिनेत्याला आठ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच त्याला दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. यासोबत त्याला 40 तास लैंगिक हिंसेच्या विरोधात शिक्षण देणाऱ्या वर्गात उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे.
2 फेब्रुवारी रोजी याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली होती. न्यायालयाने ओह येओंग-सूला एक वर्षाच्या तुरुंगवासाची आणि अल्पवयीन मुलींसोबत काम करण्यावर बंदी घालण्याची शिक्षा सुनावली होती.
ओह येओंग-सूला 2022 मध्ये एका महिलेवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. ओह येओंग-सू हा ग्रामीण भागात 2017 मध्ये एका थिएटर परफॉर्मन्ससाठी जात असताना त्याने रस्त्यावर आणि पीडितेच्या घरासमोर अत्याचार केला होता.
अभिनेता ओह येओंग-सू याने 'पीडित मुलगी आपल्यासाठी मुलीसारखी आहे, असे सांगून त्याच्यावर लावण्यात आलेला आरोप फेटाळले आहे. "या वयात मला कोर्टात येऊन उभं राहावं लागत आहे हे खूप कठिण आहे. माझ्या आयुष्याचा शेवट अशा प्रकारे संपेल असं वाटलं नव्हतं. यामुळे माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले," असे ओह येओंग-सू याने म्हटलं आहे.