'अकेला मोदी कुछ नहीं कर सकता...', मराठी अभिनेत्रीची पोस्ट; शिंदे, फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाली 'राजकारणी प्रचंड...'

एकीकडे लोकसभा निवडणुकांचे मतदान सुरु असताना दुसरीकडे एका मराठी अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा पाहायला मिळत आहे. अकेला मोदी कुछ नहीं कर सकता, असे म्हणत तिने एक पोस्ट शेअर केली आहे. 

नम्रता पाटील | Updated: Apr 21, 2024, 02:58 PM IST
'अकेला मोदी कुछ नहीं कर सकता...', मराठी अभिनेत्रीची पोस्ट; शिंदे, फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाली 'राजकारणी प्रचंड...' title=

Radhika Deshpande Instagram Post On PM Modi : सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी 19 एप्रिलला पार पडले. यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. एकीकडे लोकसभा निवडणुकांचे मतदान सुरु असताना दुसरीकडे एका मराठी अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा पाहायला मिळत आहे. अकेला मोदी कुछ नहीं कर सकता, असे म्हणत तिने एक पोस्ट शेअर केली आहे. 

मराठी नाटक आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री राधिका देशपांडेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लक्षद्वीपमधील एक फोटो पोस्ट केला आहे. यात तिने अकेला मोदी कुछ नहीं कर सकता या आशयावर आधारित पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 

राधिका देशपांडेची पोस्ट

"अकेला मोदी कुछ नहीं कर सकता। असं म्हणतात एकटे मोदी काही करू शकत नाही. १३ मे ला मी मतदान करणार आहे. ते गोपनीय असेल. "मत पेटीत एक मत पडलं ना पडलं काय फरक पडतो?" "अकेला मोदी कुछ नहीं कर सकता," अशी मतं असताना तर मला करायलाच हवं. मोदी जेंव्हा एकटे असतात तेंव्हा ते काही करू शकत नाही तसंच आपण ही काही करू शकत नाही. मग कशाला द्यायला जायचं मरणी उन्हात मत द्यायला! पण काही दिल्या शिवाय मिळतंय कुठे? जगाची रीत आहे. 

"आधी हाताला चटके तेंव्हा मिळते भाकर". भारत हा देश कुटुंबवत्सल असल्यामुळे मी मतदान हे देशासाठी करणार आहे. आपण एकटे नाही. सारा देश म्हणजे आपण. आणि मोदी तरी कुठे एकटे होते? मोदी, तुम्हाला एकटं पाडण्यासाठी काही जण काम करत असतील ही पण तुम्ही एकटे नव्हतात. कायदा, सुव्यवस्था, स्वछता, आत्मनिर्भरता, विकास, सुरक्षा, सेवा, जीवन सरल होण्यासाठी जे जे तुम्ही केलंत ते आमच्या मुळेच तर झालं! 

आमची भागीदारी होती म्हणूनच सारं काही शक्य झालं. यथा राजा तथा प्रजा. आता तुम्हाला राजा म्हंटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. मला काही जण म्हणतील ही, "अगं, कलाकार आहेस तू. निरपेक्ष राहावं. एकालाच असं राजा म्हणून कवतुक करणं म्हणजे जाहीर समर्थन देण्यासारखंच आहे." आपल्याकडे वाईटाला वाईट म्हटलं तर चालतं पण चांगल्याला कधीच चांगलं म्हणू नये असं ही मानणारे लोक आहेत. राजा कसा असावा ह्यावर नको बोलायला. त्यांचे प्रधान जर चांगले असतील तर तो चांगला ठरतो. माझा मोदींशी कधी थेट संबंध नाही आला पण ते ज्यांच्यावर अवलंबून आहेत त्यांच्याशी डायरेक्ट संबंध आला. 

माझी छोटीशी बालनाट्य संस्था, मला काही समस्या येत होत्या त्या मा. मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे  यांनी सोडवल्या, त्यांचे OSD Rahull Gethe ह्यांनी ताबडतोब दखल घेतली. काही IAS officers, काही आयुक्तांना भेटले. Devendra Fadnavis  सांनी आमच्या नाटकाबद्दल ट्वीट केलं. मला त्यांना भेटून असं लक्षात आलं की त्यांचं काम सोप्पं नाही. आपले राजकारणी प्रचंड मेहनती आहेत, निष्ठेने काम करतात. शरद माधव पोंक्षे दादा नी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. तुम्ही तुमची समस्या घेऊन गेलात की कामं होतात, मार्ग निघतात. सरकारी काम म्हणजे नैराश्याने भरलेलं नाही. काळ बदलला आहे आणि कर्तृत्ववान माणसं पदावर आहेत. म्हणूनच आपल्याला बदल घडताना दिसत आहेत. आपल्याला आपलं काम केलंच पाहिजे. मौत का सौदागर, कातील, लोगों को जलानेवाला, हिटलर असं उगाच बोलणारी माणसं नको. आत्मसमर्पण करणारी माणसं हवीत. झोकून देऊन काम करणारी माणसं हवीत. दूरदृष्टी असणारी, धूर्त, हुशार, स्वाभिमानी आणि राष्ट्रहिता साठी काम करणारी हवी.  माझं मत मी मांडलं. तुम्ही कधी देता आहात? मला तुमची पण साथ हवी नाही तर मी एकटी कुठे काय करू शकते!", असे राधिका देशपांडेने म्हटले आहे. 

दरम्यान राधिका देशपांडे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत राधिकाने अरुंधतीची मैत्रिण देविका हे पात्र साकारले होते. सध्या ती ‘सियावर रामचंद्र की जय’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहे. त्यासोबत सध्या राधिका ही बालकलाकारांसाठी वर्कशॉप घेत आहे.