Sumeet Pusavale New Serial : स्टार प्रवाह वाहिनीवर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 18 मार्चपासून स्टार प्रवाह वाहिनीवर ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘साधी माणसं’ या दोन नवीन मालिका सुरु होत आहेत. यातील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत अनेक तगडे कलाकार झळकणार आहेत. आता नुकतंच या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव समोर आले आहे. ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’मुळे घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता सुमीत पुसावळे हा या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेता सुमीत पुसावळेने ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतून एक्झिट घेतली. यानंतर सुमीतने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्टही शेअर केली होती. यात त्याने चाहत्यांसह सर्व कलाकारांचे आभारही मानले होते. मला त्या रोलमध्ये स्वीकारलं, माझ्यावर विश्वास ठेवलात अशीच साथ तुम्ही यापुढे ही द्या, असाच विश्वास माझ्यावर ठेवा, आणि असच प्रेम माझ्यावर अन माझ्या कामावर करा. लवकरच भेटूयात, असे सुमीत पुसावळेने म्हटले होते. त्यानंतर सुमीत हा कोणत्या मालिकेत झळकणार याची सर्वत्र चर्चा रंगली होती.
अखेर सुमीत पुसावळे हा ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत झळकणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. नुकतंच या मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोत ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेतील हृषिकेश रणदिवेच्या पात्राची एंट्री पाहायला मिळत आहे. यात सुमीतचा रुबाबदार अंदाज पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच या मालिकेतील सर्व कलाकारांची नावंही समोर आली आहेत.
‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे, सुमीत पुसावळे, सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, आशुतोष पत्की, प्रतिक्षा मुणगेकर, नयना आपटे व बालकलाकार आरोही सांबरे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. सुमीतने दिलेल्या या गुडन्यूजनंतर त्याची पत्नी मोनिकानेही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्याची आई आणि पत्नी त्याला औक्षण करताना दिसत आहे. त्याबरोबरच तो केक कापत कुटुंबासोबत सेलिब्रेशनही करताना दिसत आहे. याचा खास व्हिडीओही त्याची पत्नी मोनिकाने शेअर केला आहे.
दरम्यान, सुमीतने ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत बाळूमामांची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली. या मालिकेची कथा संतोष अयाचित यांनी लिहिली आहे. तर निशांत विलास सुर्वे यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. याआधी त्याने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘लागीरं झालं जी’ या मालिकेत काम केलं होतं.