'घोडबंदर रोडवरील ट्रॅाफिक, लोकांची गरम डोकी अन्...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सांगितला अनुभव, म्हणाला 'ही समस्या सुटण्यासाठी...'

ते ठाण्यातील घोडबंदर परिसरात वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर काय करतात, याबद्दल सांगताना दिसत आहे. तसेच हा एकंदर अनुभव कसा असतो, याबद्दलही त्यांनी भाष्य केले आहे. 

Updated: Mar 16, 2024, 09:25 PM IST
'घोडबंदर रोडवरील ट्रॅाफिक, लोकांची गरम डोकी अन्...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सांगितला अनुभव, म्हणाला 'ही समस्या सुटण्यासाठी...' title=

Milind Gawali Traffic Jam Experience : बोरिवली, वसई भागातून अनेकजण ठाणे, घोडबंदर परिसरात कामानिमित्त येताना दिसतात. तसेच ठाण्याहून देखील बोरिवली, वसई, विरार, गुजरातच्या दिशेने वाहतूक होत असते. पण बहुतांश वेळा घोडबंदर मार्गावरुन वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. आता असाच एक अनुभव एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला आला आहे. आई कुठे काय करते या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते मिलिंद गवळींनी याबद्दलचा एक अनुभव सांगितला आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून आई कुठे काय करते या मालिकेचे शूटींग ठाण्यात सुरु आहे. त्यामुळे अनेक कलाकारांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. नुकतंच या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ते ठाण्यातील घोडबंदर परिसरात वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर काय करतात, याबद्दल सांगताना दिसत आहे. तसेच हा एकंदर अनुभव कसा असतो, याबद्दलही त्यांनी भाष्य केले आहे. 

मिलिंद गवळी यांनी सांगितला अनुभव

"मुंबई to ठाणे, हे गेली चार वर्ष माझा ठाणे ते अंधेरी ते ठाणे असा माझा प्रवास होत असतो. मध्ये येतो एक घोडबंदर रोड येतो ,फाउंटन हॉटेल पासून सुरू होतो, फाउंटन हॉटेल पासून सरळ गेलं तर मुंबई आमदाबाद रोड आणि उजव्या बाजूला गेलं तर ठाणे, त्या रस्त्याला खूप ट्रेलर ट्रक्स कमर्शियल व्हेहिकल्स असतात, फाउंटनच्या क्रॉसिंग ला एक भव्य मोठा प्रशासनाने ब्रिज बांधला आहे, बरीच वर्ष या ब्रिजचं काम सुरू होतं, ज्सा वेळेला हे बांधकाम सुरू होतं तेव्हा दोन दोन तीन तीन तास गाड्यांना थांबायला लागायचं, आता तो ब्रिज सुरू झाला आहे, पण तरीही बऱ्याच वेळेला त्या घोडबंदर रोडला ट्रॅाफिक हेवी असतं आणि ट्रॅफिक जॅम असतं. 

एकदा का ट्रॅफिक जॅम झालं की खूपशा प्रवाशांची आणि ड्रायव्हरची चिडचिड मी पाहिली आहे, ट्रॅफिक मध्ये गाड्याही गरम झालेल्या असतात आणि गाड्यांमध्ये बसलेल्या लोकांची डोकी ही... पण मी घरातून निघालो की स्वतःला स्वतःच्या मनाला सांगतो की “बाबा ट्रॅफिक असणार, उगाच चिडचिड करू नकोस उगाच आपलं डोकं गरम करू नकोस शांतपणे जा थोडा उशीर लागला तरी चालेल, वेळेवर पोहोचायची सवय मग थोडा अर्धा पाऊण तास घरातून लवकर निघ “त्यामुळे मी शांतपणे जातो आणि शांतपणे येतो, पण कधी कधी खरंच कंटाळा येतो त्या ट्रॅफिकचा, मग आता मी एक नवीन प्रयोग सुरू केला आहे, तो प्रयोग असा आहे की घरातून निघालो घोडबंदर रोडला लागलो ट्राफिक लागलं की गाण्याचा क्लास लावायचा, म्हणजे गाणं शिकायचं, गाणी म्हणायची, गाड्यांच्या काचा बंद असतात त्यामुळे आपला आवाज कोणालाच जात नाही, आपण किती वाईट गातो आहोत, हे फक्त आपल्यालाच कळतं, आणि मग बरेच वेळेला आपली बुद्धी आपल्याला सांगत असते की “अरे तुझ्या आवाजापेक्षा ते ट्राफिक जाम बरं आहे, जरा शांत राहशील का जरा ? “ पण आपण आपल्या मनाचं बुद्धीच ऐकायचं नाही ! गात रायचं !

अगदीच गाडीमध्ये कोणी असेल तर मग एखाद जूनं गाणं लावायचं आणि आपण आपले फक्त ओठ हलवत राहायचे, आपण स्वतःला हिरो समजत रहायचं ! ट्रॅफिकचा विचार करत बसायचं नाही कारण ट्रॅफिकची समस्या काय फक्त आपल्या शहरात आहे का ? नाही शारजा ते दुबई चार चार तास रांगेत गाड्या उभ्या असतात , लंडन अमेरिका जपान चायना जगातल्या बहुतेक देशांमध्ये ही समस्या आहेच, आता ही समस्या सुटण्यासाठी किती पिढ्या लागतील माहिती नाही. मस्त “चलती का नाम गाडी” चं गाणं लावायचं “बाबू समजो ईशारे होरंन पूकारे पम पम पम , यहा चलती को गाडी कहते है प्यारे पम पम पम” असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे. 

दरम्यान मिलिंद गवळी हे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. सध्या ते शूटींगच्या निमित्ताने पंजाबमध्ये गेले आहेत.