मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नामांतरावर मराठी अभिनेत्रींचे हटके रॅप साँग, पाहा व्हिडीओ

 आता यावर मराठमोळ्या अभिनेत्रींनी एक हटके रॅप साँग तयार केले आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

Updated: Mar 16, 2024, 08:12 PM IST
मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नामांतरावर मराठी अभिनेत्रींचे हटके रॅप साँग, पाहा व्हिडीओ  title=

Mumbai Railway Stations Name Change : मुंबईची लाईफलाईन म्हणून मुंबई लोकलला ओळखले जाते. आता लवकरच मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नावे इतिहासजमा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई उपनगर रेल्वेवरील आठ रेल्वे स्थानकांच्या नामांतराला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. यात मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेवरील एकूण 8 रेल्वे स्टेशन्सचा समावेश आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर रेल्वे स्थानकांना नवी नावे लागू केली जाणार आहेत. आता यावर मराठमोळ्या अभिनेत्रींनी एक हटके रॅप साँग तयार केले आहे. 

नुकतंच vizotcompany या इन्स्टाग्रामवर पेजवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यात "आपलेपणा, आपल्या मराठी नावातच" असे म्हटले आहे. त्यासोबत त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक रॅप साँग पाहायला मिळत आहे. या गाण्यात अनेक मराठी अभिनेत्री मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या बदललेल्या नावाची माहिती देताना दिसत आहे. यात पल्लवी पाटील, प्रियदर्शनी इंदलकर, तन्वी पालव आणि ऋतुजा बागवे या अभिनेत्री पाहायला मिळत आहे. या सर्व अभिनेत्री रेल्वे स्थानकांच्या बदलेली नाव रॅपमध्ये सांगताना दिसत आहेत. 

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यावर अनेकांनी "मला हे रिल आवडले", "खूपच छान", "आम्ही खूप एन्जॉय केले", "लय भारी" अशा कमेंट केल्या आहेत. तर काहींनी फायर, स्माईली, हार्ट असे इमोजीही पोस्ट केले आहेत. 

पाहा व्हिडीओ :

दरम्यान "मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलून नवी नावे द्यावी", अशी मागणी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं होतं की, मुंबईतील अनेक रेल्वे स्थानके आजही ब्रिटिशकालीन नावाने ओळखली जातात. मात्र, या रेल्वे स्थानकांच्या परिसरातील इतिहास पाहता, या स्थानकांच्या नामांतराची मुंबईकरांची मागणी आहे. करी रोड रेल्वे स्थानकाला लालबाग तर मरीन लाईन्स स्थानकाला मुंबादेवी यांसह एकूण सात रेल्वे स्थानकांचे नामांतर करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली होती.  

राहुल शेवाळे यांच्या या मागणीनंतर राज्य सरकारने याला तत्वतः मंजुरी दिली आहे. कॅबिनेट निर्णयानंतर राज्य सरकारच्या वतीने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर रेल्वे स्थानकांना नवी नावे लागू केली जाणार आहेत. यामुळे मुंबईतील रेल्वे स्थानकांचे लवकरच नामांतर होणार आहे

अशी असणार नवीन नावे

1. करी रोड - लालबाग
2. सँडहर्स्ट रोड - डोंगरी
3. मरीन लाईन्स - मुंबादेवी
4. चर्नी रोड - गिरगाव
5. कॉटन ग्रीन -काळाचौकी
6. डॉकयार्ड - माझगाव
7. किंग्ज सर्कल - तीर्थंकर पार्श्वनाथ
8. मुंबई सेंट्रल - नाना जगन्नाथ शंकरशेट