Kiran Mane Speech : स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणजे किरण माने. सध्या किरण माने हे राजकारणात त्यांचे नशीब आजमावताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच किरण माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. आता किरण माने यांच्या माढा मतदारसंघातील एका भाषणाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. किरण माने यांनी या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार निशाणा साधला.
किरण माने यांनी नुकतंच फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ते जोरदार भाषण करताना दिसत आहेत. ज्या माणदेशी मातीत लहानाचा मोठा झालो... तिथं पहिल्यांदा राजकीय मंचावर उभं रहाताना एकच ठरवलंवतं. काहीही थापेबाजी करून वेळ मारुन नाही न्यायची. जे बोलायचं ते मनातलं बोलायचं... खरं बोलायचं... कष्टकर्यांच्या समस्यांवर बोलायचं. मातीशी बेईमानी नाही करायची, असे कॅप्शन किरण मानेंनी या व्हिडीओला दिले आहे.
यावेळी भाषणादरम्यान किरण माने म्हणाले, "2014 साली जेव्हा मोदी सरकार आलं तेव्हा खरंच मलाही खूप आनंद झाला होता. मी सुद्धा तोपर्यंत काँग्रेसविरोधक झालो होतो. मलाही वाटत होतं की खूप भ्रष्टाचार होतोय, अण्णांचं आंदोलन झालं होतं, त्याचा परिणाम होता. नाही नाही, आता मोदी आले पाहिजेत, अच्छे दिन येणार असं वाटायला लागलं. शंभर दिवसात काळा पैसा परत आणणार, असं ते म्हणाले होते. प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख येणार असंही ते म्हणाले होते. म्हटलं काही नाही झालं तरी चालेल, एक पायरी जरी आपण आता आहोत, त्यापेक्षा वर गेलो तरी बस्स....आज दहा वर्षांनंतर कळतंय, एक पायरी वर जाणं दूर, आपण हजारो पायऱ्या खाली गेलोय. स्वातंत्र्यानंतरच्या सगळ्या भयानक परिस्थिती आपण आहोत."
"अत्यंत नीच घृणास्पद राजकारण चाललंय. तुमच्या खिशातला पैसा ते रोज लुटतात. शेतकऱ्याला सांगतात तुमच्या खात्यात 2 हजार टाकले, आपण खूश व्हायचं. आपण भिकारी आहोत का? अरे तो आपलाच पैसा आहे. ते आपल्याला युरीया...खतं मिळत होती. 2014 मध्ये 400-450 रुपयाला एक पोतं मिळायचं. त्याची मूळ किंमत होती 499 रुपये. आज तेच पोतं 1250 रुपयाला मिळतंय. त्यावर मूळ किंमत दाखवतात 2500 रुपये. आज आपल्या धान्याला भाव काय? तो वाढलाय का? तो वाढलेला नाही. आपला इनकम वाढला नाही. त्याउलट तुमचे लाखो रुपये काढून घेतलेत आणि तुम्हाला 2 हजार रुपये महिना खात्यावर टाकतात", अशी टीकाही किरण माने यांनी केली.
"तिकडे पंजाब हरियाणाचे शेतकरी बॉर्डरवर जाऊन बसलेत, ते तुमच्यासाठी जाऊन बसलेत. त्यांच्यावर गोळीबार होत आहे. त्यांच्यावर अशूधुराची नळकांडी फोडली जात आहे, या बातम्या तुम्हाला दाखवत नाहीत. मणिपूरच्या बातम्या तुम्हाला दाखवलेल्या नाहीत. आपल्या भगिनींना निर्वस्त्र करुन फिरवलंय. महिला सबलीकरणाचं सर्वात मोठं उदाहरण कोणतं तर महिला कुस्ती खेळायला लागल्या. पुरुषांच्या बरोबरीने उभ्या राहिल्या. त्या कुस्तीगीर महिला रस्त्यावर आल्या आमचं लैंगिक शोषण होतं, त्यांना न्याय मिळाला नाही आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांशी बरोबरी करत आहेत लायकी आहे का यांची", असा घणाघातही किरण माने यांनी केला.