Zee Chitra Gaurav Puraskar 2024 : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून श्रेयस तळपदेला ओळखले जाते. श्रेयसने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या श्रेयस तळपदेला डिसेंबर महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. मुंबईतील नामांकित रुग्णालयात श्रेयसला दाखल करण्यात आले होते. या संपूर्ण काळात श्रेयसला त्याची पत्नी दीप्तीने खंबीरपणे साथ दिली. हृदयविकाराचा झटका आलेल्या श्रेयसला त्याच्या पत्नीने मृत्यूच्या दारातून परत आणलं. आता एका कार्यक्रमादरम्यान श्रेयस तळपदेवर कविता सादर करण्यात आली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
श्रेयस तळपदेने अवघ्या दोन महिन्यांत रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले. सध्या तो ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रेयसने ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्याची पत्नी दीप्ती तळपदेही उपस्थित होती. ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यावेळी श्रेयससाठी अमेय वाघने भावूक कविता सादर केली. ही कविता ऐकल्यावर उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले.
"संपले जरी श्वास तरी श्रेयस ते परत घेऊन येईल. श्वास जरी संपले तरी हात होता हाती… कारण, देवासोबत भांडत तिथे त्याची बायको उभी होती, देव म्हणाला जा परत…हिरो म्हणाला काय? आईच्या मनात मायेची, रसिकांच्या मनात प्रेमाची, मुलीच्या मनात ओढीची आणि बायकोच्या मनात साथीची अजूनही धडधड चालू आहे. म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे…. म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे", अशी भावूक कविता अमेय वाघने श्रेयस तळपदेसाठी सादर केली.
अमेय वाघने पुरस्कार सोहळ्यादरम्यान सादर केलेली कविता ऐकून श्रेयससह त्याची पत्नी दीप्तीचे डोळे पाणावले. याबरोबरच अभिनेत्री वंदना गुप्ते यांचेही डोळे पाण्याने भरले होते. अमेयची ही कविता ऐकल्यानंतर श्रेयसने हात जोडून त्याचे आभार मानले.
दरम्यान श्रेयसने आतापर्यंत मालिका, नाटक, चित्रपट यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याने मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ओम शांती ओम, हाऊसफुल्ल २, इक्बाल यांसारख्या हिंदी चित्रपटांमधील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून त्याने मराठी टेलिव्हिजनसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता सध्या तो ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.