Uber Taxi Driver : आज महिलांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीनेच नाही तर, अनेक संघर्षांचा सामना करत प्रत्येक क्षेत्रात स्वतःचं एक अस्थित्व तयार केलं आहे. पण आज 21 व्या शतकातही महिलांना अनेक वाईट प्रसंगांचा (female security) सामना करावा लागतो. असंच काही झालं आहे अभिनेत्री मनवा नाईक (Manava naik) सोबत. शनिवारी रात्री 8 च्या सुमारास मनवासोबत एक धक्कादायक घटना घडली. अभिनेत्रीने सर्व घडलेली घटना फेसबुकवर पोस्ट केली आहे.
उबेर या ऍप्लिकेशन (uber driver app) बेस टॅक्सी सेवेच्या चालकाकडून (Taxi Driver) हा भयंकर अनुभव आल्याचं तिने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. मनवाने शनिवारी उबेर बुक केली. बीकेसी परिसरात आल्यानंतर उबेर चालकाने फोनवर बोलण्यास सुरुवात केली.
तेव्हा मनवाने चालकास ड्रईव्ह करताना फोनवर बोलू नकोस, असं सांगितलं. पुढे चालकाने सिग्नलही तोडला. त्यावर मनवाने त्याला पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानं ऐकलं नाही. थोड्यावेळाने ट्रॅफिक पोलिसांनी त्याला अडवलं आणि त्याच्या गाडीचा फोटो काढला.
एवढं होवून सुद्धा चालक पोलिसांसोबत वाद घालू लागला. त्यानंतर अभिनेत्रीने मध्ये पडून पोलिसांना त्याला जाऊ देण्याची विनंती केली. त्यावर सदर चालकाने त्यांच्याशी उद्धट वर्तन केलं. पुढे जावून चालकाने अभिनेत्रीला धमकावयला सुरुवात केली.
धमकावल्यानंतरही मनवाने प्रवास सुरु ठेवला. पुढे चालकाने गाडी थांबवली आणि मनवासोबत वाद घालायला सुरुवात केली. मनवाने त्याला पोलीस स्टेशनमध्ये गाडी थांबवण्यास सांगितलं.
दरम्यान त्याने दोन वेळा गाडी उभी करण्याचा प्रयत्न केला आणि तो मनवा यांना धमकवू लागला. मनवा यांनी उबेर सेफ्टीला कॉल केला पण उबेरचा प्रतिनिधी अन्य कॉलवर व्यग्र होता. यावेळी चालकाने कुणाला तरी फोन केला.
चालकाने अन्य व्यक्तीला फोन केल्यानंतर मनवाने त्याला गाडी थांबवण्यास सांगितलं. पण त्याने गाडी थांबवली नाही. त्यानंतर मनवान आरडाओरडा करायला सुरुवात केली. मनवाच्या ओरड्यामुळे सतर्क झालेल्या दोन बाईक चालक आणि एका रिक्षा चालकाने गाडीला घेराव टाकून ती थांबवली आणि मनवा यांची सुखरूप सुटका झाली.
आता मनवा सुरक्षित असली तरी, अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे. 'मी आता सुरक्षित असले तरी, मी घाबरले आहे...' असं देखील मनवाने पोस्टमध्ये लिहिलं आहे. अभिनेत्री पोस्ट करत चालकाचा फोटो आणि कारची नंबर प्लेट देखील शेअर केली आहे.