मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत तिच्या बोल्ड आणि बेधकड अंदाजामुळे चर्चेत असते. आता ती झी 5 च्या आगामी रियल सीरीज 'द स्टोरी' च्या एक एपिसोडमध्ये दिसेल. यात मल्लिका तिची न सांगितलेली कहाणी सांगणार आहे. खऱ्या आयुष्यातील किस्से 'द स्टोरी' मधून शेअर केले जातात.
2009 मध्ये एक उत्तर भारतीय इसम माझा पाठलाग करत होता. तो फोनही करत असे. त्याला मी शॉर्ट स्कर्ट्स घातलेले आवडत नसे. तू साडी का नाही घालत? डोक्यावरुन पदर का नाही घेत? भारतीय संस्कृती का मानत नाही? असे प्रश्न विचारत असे. मला शूट करण्याचा त्याचा प्लॅन होता. पण पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याविरुद्ध कारवाई झाली आणि त्याला अटक करण्यात आली, असे मल्लिकाने झी 5 च्या एपिसोडमध्ये सांगितले. ही प्रकरणाबद्दल अधिक माहिती तिने या कार्यक्रमात दिली आहे. त्याचबरोबर खास मेसेजही दिला आहे.
तसंच भारतात महिलांच्या असुरक्षिततेबद्दल ती बोलली. मल्लिका म्हणते की. काही वर्षांपूर्वी मी बोलले होते की, भारतात महिला सुरक्षित नाहीत. आणि अलिकडेच मी सीएनएनचा एक रिपोर्ट वाचला त्यात लिहिले होते की, कोणत्याही महिलेला राहण्यासाठी भारत ही एक भयंकर जागा आहे. पण हे वाचून फार दुःख झाले. जो देश आपल्या महिला आणि मुलांना सुरक्षित ठेवू शकत नाही तोच देश प्रगतीची चर्चा करतो. मला हे समजत नाही.
त्याचबरोबर बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचचा अनुभव असल्याचे मल्लिकाने अलिकडेच एका मुलाखतीत सांगितले होते. पुढे मल्लिका म्हणाली की, मी खऱ्या आयुष्यात बोल्ड असले तरी मानाने जगते. मला स्वतःचा अभिमान आहे. मी असे कोणतेही काम केलेले नाही ज्याची मला लाज वाटेल.