'झी मराठी' वरील मालिकांच्या सेटवर महाराष्ट्र दिन अनोख्या पध्दतीने साजरा

मालिकांच्या सेटवर रंगला महाराष्ट्र दिन 

Updated: May 1, 2021, 03:11 PM IST
'झी मराठी' वरील मालिकांच्या सेटवर महाराष्ट्र दिन अनोख्या पध्दतीने साजरा title=

मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय घेऊन नियमावली कठोर करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे मनोरंजनाला ब्रेक लागू नये आणि प्रेक्षकांचं मनोरंजन अविरत सुरु राहावं म्हणून झी मराठीवरील मालिकांचं चित्रिकरण महाराष्ट्राबाहेरील राज्यात हलवावं लागलं आता बेळगाव, गोवा, सिल्वासा, दमण आणि जयपूर याठिकाणी मराठी मालिकांचं शूटिंग सुरु आहे. 

महाराष्ट्रापासून दूर राहून शूटींग करायला लागत असलं तरी मनात वसलेल्या महाराष्ट्रप्रेमाला वाट करून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न झी मराठी आणि मालिकेतील कलाकारांनी केला या मंडळींनी अनोख्या पद्धतीने सेटवर महाराष्ट्र दिन साजरा केला. सुरुवात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पूजा करून झाली. १ मे हा कामगार दिन देखील असल्याने सेटवरील तंत्रज्ञांचा सत्कार केला गेला.

सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ पारंपारिक पेहरावात होते. महाराष्ट्राची ओळख असलेले मानाचे फेटे सगळ्यांनी बांधले होते. महाराष्ट्राबाहेर शूटींग सुरु असल्याने सगळी टीम घरच्या जेवणाला मिस करते आहे, त्यामुळे खास मराठमोळ्या जेवणाची मेजवानी होती.

 

ह्या सगळ्या कोव्हिड काळात मनोरंजन विश्व जरी कार्यरत असलं तरी, ह्या संकटकाळात आपल्या लोकांच्या मदतीला येण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून 'माझा होशील ना', ओशन फिल्म कंपनी आणि सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ मिळून त्यांच्या मानधनातून एक निधी उभा करणार आहेत, जो महाराष्ट्रदिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीला सुपूर्त करण्याच येईल.