बॉलिवूड गायक सोनू निगम अनेकदा आपल्या बेधडक विधानांमुळे वादात अडकलेला असतो. नुकतंच पुन्हा एकदा त्याचं नाव वादात आलं आहे. पण याच्यात सोनू निगमचा थेट काहीही संबंध नसतानाही त्याला ट्रोल केलं जात आहे. झालं असं की, मंगळवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले. यावेळी अयोध्येत भाजपा उमेदवाराचा पराभव झाल्याने चांगलीच चर्चा रंगली होती. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यादरम्यान अचानक सोनू निगमचं नाव चर्चेत आलं होतं.
एक्सवर सोनू निगम नावाच्या एका अकाऊंटवरुन अयोध्येतील निकालावर भाष्य करण्यात आलं होतं. नावात साधर्म्य असल्याने अनेकांना हे गायक सोनू निगमचं अकाऊंट आहे असं वाटलं आणि त्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. यावर आता सोनू निगमने भाष्य केलं आहे.
सोनू निगमने हिंदुस्तान टाइम्सशी संवाद साधताना सांगितलं की, "मला आश्चर्य वाटत आहे की, कशाप्रकारे न्यूज चॅनेल्ससह लोकांनीही साधी एक मुलभूत गोष्ट तपासून पाहिली आहे. त्या हँडलवर स्पष्ट उल्लेख आहे, 'सोनू निगम सिंह' आणि डिस्क्रिप्शनमध्ये तो बिहारचा एक फौजदारी वकील असल्याचं लिहिलं आहे".
पुढे त्याने सांगितलं की, "याच घाणेरड्यापणाने मला 7 वर्षांपूर्वी ट्विटर सोडण्यास भाग पाडलं होतं. मी वायफळ राजकीय विधानं करत नाही. आणि मी फक्त माझ्या कामावरच लक्ष केंद्रीत करत असतो. फक्त माझ्यासाठी नव्हे तर माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ही घटना चिंताजनक आहे".
आपल्या नावाशी साधर्म्य असणारी व्यक्ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन गेल्या अनेक दिवसांपासून अशा पोस्ट करत आहे. आपल्या ओळखीच्या लोकांकडून नेहमी याचे स्क्रीनशॉट्स मिळत असतात. आपल्या टीमने या युजरशी संपर्क साधला होता. सोनू निगम असल्याचं नाटक बंद करावं असं त्याला सांगण्यात आलं होतं. त्यावर काहीतरी तोडगा निघेल असं त्याने म्हटलं असल्याची माहिती सोनू निगमने दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला अयोध्येत पराभवाचा सामना करावा लागला. यावर 'सोनू निगम' युजरनेम असणाऱ्या अकाऊंटवरुन पोस्ट करत लिहिण्यात आलं की, "ज्या सरकारने संपूर्ण अयोध्येचा कायापालट केला, नवीन विमानतळ दिलं, नवीन रेल्वे स्टेशन दिलं, 500 वर्षांनी रामाचं मंदिर बांधलं, पूर्ण एक मंदिर इकॉनॉमी तयार करुन दिली त्या पक्षाला अयोध्येचा सीटवर संघर्ष करावा लागत आहे. हेल लाजिरवाणं आहे अयोध्यावासियांनो".
जिस सरकार ने पूरे अयोध्या को चमका दिया, नया एयरपोर्ट दिया, रेलवे स्टेशन दिया, 500 सालों के बाद राम मंदिर बनवाकर दिया, पूरी की पूरी एक टेंपल इकोनॉमी बनाकर दी उस पार्टी को अयोध्या जी सीट पर संघर्ष करना पड़ रहा है।
शर्मनाक है अयोध्यावासियों!
— Sonu Nigam (@SonuNigamSingh) June 4, 2024
ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली आणि यावरुन नेटकऱ्यांनी बॉलिवूड गायक सोनू निगमला ट्रोल करण्यास सुरुवात केली. पण अनेकांना हे करताना ज्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आली आहे ते वेगळ्याच सोनू निगमचं आहे याची कल्पनाच नव्हती.