दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव.... 'पाध्ये बंधू' यांच्याकडून गाण्याची पुनर्निमिती

'रामशास्त्री' सिनेमातील गाणं 

Updated: May 4, 2020, 09:57 PM IST
दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव.... 'पाध्ये बंधू' यांच्याकडून गाण्याची पुनर्निमिती  title=

मुंबई : कोरोनामुळे देशभरातील लॉकडाऊन आणखी वाढला आहे. १७ मे पर्यंत  वाढलेला लॉकडाऊन काहींना डोकीजड झाला असेल तर काहींनी या लॉकडाऊनकडे एक उत्तम संधी म्हणून पाहिलं आहे. या संधीचा उत्तम फायदा घेत संगीत क्षेत्रातील एका सुंदर जोडीने नॉस्टॅलजिक करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. संगीत क्षेत्रातील पाध्ये बंधू म्हणजे पार्श्वसंगीतकार आणि संगीत संयोजक अमित पाध्ये आणि तबला वादक प्रसाद पाध्ये यांनी एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. 

झी चोवीस तासच्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये या दोघांनी आपला हा नवा लूक शेअर केला होता. तेव्हा येत्या काही दिवसांत नवी कलाकृती घेऊन भेटीला येतोय असं यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे आज सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 

जगताचे हे सुरेख अंगण
खेळ खेळूया सारे आपण
रंक आणि राव
ह्याला जीवन ऐसें नाव...

या ओळी सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीला अगदी जुळत्या आहेत. प्रत्येकाने या दिवसांत जाणलंय की, आपण जी निसर्गाची अपरिमित हानी केली आहे. त्याची परतफेड आज आपल्याला सहस्त्रपटीने मिळत आहे. असं असताना जगाचे हे सुरेख अंगण  आपल्या विना अधिक सुरक्षित दिसतंय, सुरेख दिसतंय. अशा परिस्थिती आपण स्वतःशीच एक खेळ खेळायला हवा. जो खेळ कुठल्याही प्रकारे स्वतःला किंवा समोरच्या व्यक्तीला किंवा निसर्गाला धक्का पोहोचवणार नाही. धक्का न देता जो खेळला जातो तो खेळ,  बाकी सारे लढाया, युद्ध. आणि हीच गोष्ट आपल्या गाण्यातून अमित पाध्ये आणि प्रसाद पाध्येने मांडली आहे.  

'रामशास्त्री' या सिनेमातील शांताराम आठवले यांच्या दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव.... या गाण्याची पुनर्निमिती करण्यात आली आहे. अमित पाध्येने यामध्ये पेटी वाजवली आहे तर प्रसाद पाध्येनने तबल्याला साथ दिली आहे. या गाण्याचं संकलन विवेक पाध्ये याने केले असून जयेश आपटे यांची ही संकल्पना आहे.