Leaders : चहाच्या टपरीवर बसायचा तरी, 'त्याला' चस्का लागलेला बॉलिवूडचा...

खऱ्या सोन्याची पारख करण्यासाठी तशी नजरही असणं गरजेचं असतं... 

Updated: Nov 10, 2021, 12:58 PM IST
Leaders : चहाच्या टपरीवर बसायचा तरी, 'त्याला' चस्का लागलेला बॉलिवूडचा... title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूडमध्ये एखादा कलाकार यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर त्याच्या वाट्याला येणारी लोकप्रियता नेमकी कोणत्या पद्धतीची असते याबाबत काहीच वेगळं सांगण्याची गरज नाही. पण यशाच्या या शिखरावर पोहोचण्यापूर्वीचा काळही तितकाच महत्त्वाचा असतो. हा काळ आपल्याला परिस्थिती आणि इतरही अनेक गोष्टींबाबतचं वास्तव दाखवणारा असतो. 

अशाच काळाला ओलांडून एक तरुण चेहरा सध्या बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या कलाकारांत उठबस करताना दिसत आहे. त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. (Bollywood)

कधी एकेकाळी यशराज स्टुडिओबाहेर दिसणारा हा चेहरा आजच्या घडीला मोठमोठ्या निर्मिती संस्थांच्या बॅनरअंतर्गत साकारल्या जाणाऱ्य़ा चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे. हा चेहरा आहे, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याचा. 

सिद्धांत आजच्या घडीला ज्या बॉलिवूड चित्रपटासाठी यशराज बॅनरअंतर्गत काम करत आहे, त्याच यशराज स्टुडिओबाहेर त्यानं अनेक तासांचा वेळ व्यतीत केला आहे. 

खुद्द सिद्धांतनंच त्याच्या या प्रवासाचा उलगडा केला. 'माझं यशराज स्टुडिओशी वेगळं नातं आहे. महाविद्यालयीन दिवसांमध्ये मी अनेक मित्रांसोबत स्टुडिओमध्ये ऑडिशन किंवा इंटर्नशिपसाठी फेऱ्या मारत होतो. मी त्याच्यासोबत यायचो आणि कायमच स्टुडिओबाहेर असणाऱ्या टपरीवरचा चहा प्यायचो. मी कधी स्टुडिओमध्ये गेलो नव्हतो, कारण आदित्य चोप्रा मला स्वत:हून बोलावतील असंच माझं स्वप्न होतं. जेव्हा बंटी और बबली 2, या चित्रपटाचा प्रस्ताव माझ्याकडे आला तेव्हा हे स्वप्न पूर्ण झालं होतं.'

'बंटी और बबली 2' या चित्रपटाव्यतिरिक्त सिद्धांत शकुन बत्राच्या चित्रपटातून दीपिका पदुकोण आणि अनन्या पांडेसह झळकणार आहे. रणबीर सिंग याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'गली बॉय' या चित्रपटातून सिद्धांतनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून तो टप्प्याटप्प्यानं यशाची एक-एक पायरी चढत आहे.