नवी दिल्ली : छोट्या पडद्यावर लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या मालिकांपैकी एक नाव म्हणजे 'बालिका वधू'. या मालिकेतील प्रत्येक कलाकरानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. सध्या या मालिकेचं पुढील पर्व अर्थात दुसरा सीझन प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. त्याच निमित्तानं मालिकेच्या पहिल्या पर्वातील कलाकारांची नावं प्रकाशझोतात आला आहे.
'बालिका वधू'च्या निमित्तानं अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी (pratyusha banerjee) हिलाही बरीच प्रसिद्धी मिळाली. पण, कारकिर्दीत एका उंचीवर आलेलं असतानाच तिनं आत्महत्येचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं. प्रत्युषाच्या निधनाला पाच वर्षांचा काळ उलटला असला तरीही तिच्या मृत्यूचं गुढ उकलू शकलेलं नाही, कारण तिच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा दावा केला होता.
कुटुंबावर हलाखीची परिस्थिती
प्रत्युषाचं जाणं तिच्या कुटुंबासाठी एक मोठा आधार हिरावण्यासारखं होतं. तिच्या नसण्यामुळं कुटुंबाचं पुरतं आयुष्यंच बदललं. आता तिच्या आईवडिलांना अतिशय हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. 'आजतक'शी संवाद साधताना प्रत्युषाचे वडील शंकर बॅनर्जी यांनी मुलीच्या निधनानंतर आयुष्यात वादळच आलं आणि सारंकाही हिरावून गेलं अशी भावना व्यक्त केली. या प्रकरणाचा खटला लढता लढता त्यांनी सर्व आर्थिक पाठबळ गमावलं आणि आता मात्र त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
मुलीनं आपल्याला चांगले दिवस दाखवले पण, आता मात्र प्रत्युषाच्या निधनानंतर आपल्यावर संकटच ओढावलं आहे अशा शब्दात तिच्या वडिलांनी हतबलता व्यक्त केली. सध्या तिचे आईवडील एकाच खोलीत राहण्यास भाग आहेत. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्युषाची आई एका चाईल्ड केअर सेंटरमध्ये काम करते. तर तिचे वडील आजही या आशेवर काही कथा लिहितात की काहीतरी चमत्कार होऊन पुन्हा त्यांचं आयुष्य रुळावर येईल.
Viral Video: तुम्हालाही लाजवेल 78 वर्षीय आजीबाईंचा धमाकेदार डान्स
आर्थिक अडचणींचा मारा होत असतानाही प्रत्युषाला न्याय मिळवून देण्याचं ध्येय्य मात्र ते विसरलेले नाहीत. प्रत्युषाला मिळालेला न्याय हीच आमची अंतिम आशा असून, अखेरच्या श्वासापर्यंत त्यासाठी झटण्याची तयारी तिच्या वडिलांनी दाखवली आहे.