नागराज मंजुळेंचा 'झुंड' वादाच्या भोवऱ्यात

नागराज मंजुळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

Updated: Nov 17, 2019, 10:19 PM IST
नागराज मंजुळेंचा 'झुंड' वादाच्या भोवऱ्यात title=

मुंबई : 'सैराट' चित्रपटाच्या माध्यमातून प्रचंड प्रसिद्धझोतात आलेले चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सध्या ते बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत आगामी 'झुंड' चित्रपटाच्या कामात  व्यस्त आहेत. परंतु त्यांचा 'झुंड' मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हैद्राबादमधील चित्रपट निर्माते नंदी कुमारने ‘झुंड’ चित्रपटाच्या निर्मात्यांना कॉपीराईट उल्लंघन केल्या प्रकरणी नोटीस पाठवली आहे. 

चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते नागराज मंजुळे, टी सीरिजचे अध्यक्ष भूषण कुमार आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांना याप्रकरणी नोटिस पाठवण्यात आली आहे. कॉपीराईट उल्लंघन केल्या प्रकरणी कुमार यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. 

न्यायालयाच्या या नोटीसला फक्त टी-सीरिजने उत्तर दिले आहे. पण त्यातून काही स्पष्ट होत नसल्याची भूमिका कुमार यांनी घेतली आहे. कुमार यांनी गेल्यावर्षी चित्रपटाच्या कथेची अधिकृतरित्या  तेलंगणा सिनेमा रायटर असोसिएशनकडे नोंद केली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

परंतु चित्रपट निर्माते, अभिनेते आणि ज्यांच्या भोवती चित्रपटाची कथा फिरत आहे त्यांनी चित्रपटाचे राइट्स विकत घेतले आहेत. चित्रपटाची कथा नशेच्या आहारी गेलेल्या पण फुटबॉलवर प्रचंड प्रेम असणाऱ्या अखिलेश पॉल भोवती फिरताना दिसत आहे आणि मंजुळेंनी अखिलेश पॉल यांना प्रशिक्षण देणारे विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती करण्याचे हक्क विकत घेतले आहेत.