नवी दिल्ली : हिंदी भाषेतील प्रख्यात लेखिका कृष्णा सोबती यांना, साहित्य क्षेत्रातील सन्मानाचा 'ज्ञानपीठ' पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना साहित्य क्षेत्रातील अमुल्य योगदानासाठी प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप ११ लाख रूपये, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह असे आहे.
'जिंदगीनामा' या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने १९८० मध्येगौरवण्यात आले आहे. साहित्य अकादमीची फेलोशिपही त्यांना १९९६ मध्ये मिळाली. कृष्णा सोबती यांनी लिहिलेल्या 'जिंदगीनामा', 'ऐ लडकी', 'मित्रो मरजानी' यांसारख्या अनेक कादंबऱ्या गाजल्या.
कल्पना विलास हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. हिंदी साहित्यात आपल्या लेखनाची भर घालून ती भाषा समृद्ध करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
कृष्णा सोबती या एक व्याख्यात्या आणि भाषांतरकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. 'नफिसा', 'सिक्का बदल गया', 'बादलोंके घेरे, ,बचपन' या कृष्णा सोबती यांनी लिहिलेल्या लघुकथाही चांगल्याच लोकप्रिय झाल्या.
पद्मभूषण पुरस्कार देण्याबाबतही २०१० मध्ये त्यांना सरकारकडून विचारणा झाली होती. मात्र त्यांनी हा पुरस्कार नाकारला. सोबती यांचा जन्म १९२५ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण लाहोरमध्ये झाले. फाळणीनंतर सोबती यांनी आपल्या नवऱ्यासोबत भारतात वास्तव्य करणेच पसंत केले.