मुंबई : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक, अभिनेते किशोर कुमार यांची गाणी आजही अनेकांच्या मनात घर करुन आहेत. परंतु देशात एक अशी वेळ होती ज्यावेळी किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली होती. २५ जून १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती आणि २१ मार्च १९७७ मध्ये म्हणजेच जवळपास २१ महिन्यांपर्यंत देशात आणीबाणी सुरु होती. आज इंदिरा गांधी यांच्या काळात लागलेल्या आणीबाणीला ४४ वर्ष पूर्ण झाली आहेत. यावेळी घडलेल्या अनेक घटनांची इतिहासात नोंद आहे. या दरम्यान किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली होती.
किशोर कुमार यांना इंदिरा गांधी यांच्या आणीबाणी काळातील २० सूत्री कार्यक्रमासाठी बनवल्या गेलेल्या गाण्यासाठी त्यांचा आवाज देण्याची ऑफर देण्यात आली होती. किशोर कुमार यांनी ही ऑफर देणाऱ्या व्यक्तीला विचारले की, हे गाणं मी का गावं? त्यावर फोन करणाऱ्या व्यक्तीने किशोर कुमार यांना सांगितलं की, सूचना आणि प्रसारण मंत्री वि.सी शुक्ला यांचा तसा आदेश आहे. आदेश ऐकल्यावर किशोर कुमार भडकले आणि त्यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ नकार दिला होता.
किशोर कुमार यांच्या नकाराने मंत्री वि.सी शुक्ला यांनी ऑल इंडिया रेडियोवर किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी आणली. एवढंच नाही तर किशोर कुमार यांनी भूमिका साकारलेल्या चित्रपटांवरही त्यांनी बंदी घातली. किशोर कुमार यांच्या गाण्यांच्या ग्रामोफोन रेकॉर्ड्सची विक्रीही प्रतिबंधित करण्यात आली. आणीबाणी वेळी घडलेली ही घटना आजही अनेकांना आश्चर्यचकित करुन जाते.