लोकप्रिय मराठमोळे दिग्दर्शक केदार शिंदे हे सध्या त्यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु असतानाच आता त्यांचा आणखी एका आगामी चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या टीझरनं प्रेक्षकांना वेड लावलं आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण या चित्रपटाची पटकथा ही आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा सगळ्या महिलांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटातून एखाद्या महिलेचं आयुष्य कसं असतं आणि ती कधी तिचा विचार करते का? या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ती कुटुंबातील इतरांचा विचार करते हे दिसतं. या चित्रपटाचं नाव 'बाईपण भारी देवा' असं आहे.
चित्रपटाचा टीझर हा आज म्हणजेच 28 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात आला. त्याच खास कारण म्हणजे आजच केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 39 सेकंदाचा हा टीझर प्रेक्षकांना चित्रपटाची एक झलक देऊन गेला आहे. चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे. या टीझरच्या सुरुवातीला एका महिलेचं अर्ध आयुष्य संपत तरी तिला कळत नाही की तिनं आयुष्य जगलचं नाही. या गोष्टीची जाणील तिला खूप उशिरानं होते. याविषयी सांगताना दिसतात. तर त्यानंतर त्या कशा प्रकारे त्यांचं आयुष्य जगतात ते पाहता येते.
हेही वाचा : VIDEO : ‘महाराष्ट्र शाहीर’च्या ‘बहरला हा मधुमास’वर हिंदी कलाकारही थिरकले, जबरदस्त डान्स व्हायरल
'बाईपण भारी देवा' आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे. चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे. आपल्या समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या महत्त्वपूर्ण भूमिका त्यांच्या-त्यांच्या पातळीवर बजावत असतात पण आपलंच कळत-नकळत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटातील अभिनेत्री समाजातील अशाच स्त्रियांचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.
या चित्रपटाविषयी बोलताना केदार शिंदे म्हणाले की 'आपल्याकडे विविध विषयांवर सिनेमे बनवले जातात पण बायकांच्या मनाचा किंवा भावनांचा विचार क्वचितच केला जातो. तोच विचार मी अगं बाई अरेच्चा करताना केला आणि आता बाईपण भारी देवामध्ये यातील पुढच्या टप्प्याचा विचार करून, प्रत्येक स्त्रीला तिची कथा बघतेय किंवा ही तर मीच आहे असं वाटणारा चित्रपट आहे. आज माझा चित्रपट महाराष्ट्र शाहीर प्रदर्शित होतोय आणि त्याचबरोबर माझ्या बाईपण भारी देवा या आगामी चित्रपटाचा टीझर ही प्रदर्शित झाला आहे. ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. कारण पहिल्यांदाच प्रेक्षकांना एकाच वेळी माझ्या दोन वेगवेगळया विषयावर बनलेल्या सिनेमांची अनुभूती अनुभवता येईल. आणि हा योग जुळवून आणल्याबद्दल जिओ स्टुडिओज आणि माझे मित्र संजय छाब्रिया याचे मी मनापासुन आभार मानतो.'
जिओ स्टुडियोजचा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रत्येक स्त्रीला आता स्वतःसाठी देखील जगायला शिकवणार हे नक्की.. तेव्हा आता तयार रहा.. केदार शिंदेंचा स्पेशल टच असलेला सहा गुणी अभिनेत्रींनी चित्रपटात उडवलेली धमाल अनुभवायला!
या चित्रपटाची निर्मिती ही जिओ स्टुडिओज आणि माधुरी भोसले यांची आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे केदार शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते हे बेला शिंदे- अजित भुरे हे आहेत. चित्रपटाच्या स्टार कास्टविषयी बोलायचं झालं तर रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशा मातब्बर अभिनेत्री एकत्र पडद्यावर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. तर हा चित्रपट 30 जून 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.