‘कशा असतात ह्या बायका’, गुरूनाथची मुजोरी कायम

बायकांना कायमच गृहीत घेतलं जातं, त्यावर भाष्य करणारं लघुपट 

Updated: Oct 29, 2021, 01:18 PM IST
‘कशा असतात ह्या बायका’, गुरूनाथची मुजोरी कायम title=

मुंबई : भावा बहिणीच्या नात्यातले, नाजूक पदर उलगडणारी, एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या पाठीशी समर्थपणे उभी राहणारी ही नव्या जमान्यातील भावा बहिणीची जोडी. आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रिची सर्व पातळ्यांवर लढण्याची आणि नाती जपण्याची सक्षमता दाखविणारी एक छोटीशी गोष्ट म्हणजे ‘कशा असतात ह्या बायका’. नुकताच हा लघुपट सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. या लघुपटास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: महिलावर्गाची लघुपटास पसंती मिळत आहे.     

भावा-बहिणीच्या नात्याला अधोरेखित करणाऱ्या या लघुपटात अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिनेता अभिजीत खांडकेकर यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र आली आहे. कोटा फॅक्टरी फेम अभिनेता मयुर मोरेने सुद्धा या भावस्पर्शी लघुपटाद्वारे मराठीत पदार्पण केले आहे. या तिघांच्या अभिनयाची सध्या चर्चा सुरु आहे.

या लघुपटामध्ये एक महत्वाची बाब आहे,  ती अत्यंत तरल, हलकाफुलका आणि हळव्या पद्धतीने एक महत्त्वाचा संदेश देते. अप्रत्यक्षपणे, ही शॉर्ट्फिल्म नवीन पिढीच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते. जरी  भाऊबीज ह्या थीमवर हा लघुपट असला तरी ही कथा केवळ बहिणीबद्दल नाही. ती आपल्या समाजातील बहुतांश महिलांची भावना व्यक्त करते. तेजश्री, अभिजीत आणि मयूरची जुगलबंदी पाहणं ही एक मेजवानी आहे.

पुरुषांचा ब्रॅंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ’कॉटन किंग’ यांनी स्त्रियांच्या सन्मानार्थ या लघुपटाची निर्मिती केली आहे. महिलांचं भावविश्व खूप वेगळं असतं. माया, ममता, त्याग, विश्वास, नि:स्वार्थ प्रेम, समर्पित भावना हे सारे गुण स्त्रियांच्या ठायी दिसतात. आपल्या परिवारावर या गुणांची त्या मनसोक्त उधळण करतात. स्त्रियांच्या या भावविश्वाचे हळूवार पदर सदर लघुपटाद्वारे उलगड्ण्य़ात आले आहे.  

‘कशा असतात ह्या बायका’ हा लघुपट सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम वर पाहायला मिळेल. अदभूत क्रिएटीव्हज निर्मित हा लघुपट दिग्दर्शित केला आहे वैभव पंडित यांनी आणि लिहिला आहे मोनिका धारणकर यांनी.

दिग्दर्शक वैभव पंडित म्हणतात, ”भाऊबीजेच्या निमित्ताने शॉर्ट्फिल्म बनवण्य़ासाठी कॉटनकिंगकडून असा ब्रिफ मिळणे विलक्षण होते. उत्तम चर्चा, विचारमंथन आणि अनेकवेळा लिखाण केल्यानंतर आम्ही कथेची योग्य नस पकडू शकलो. कॉटनकिंगने आम्हाला जी मोकळीक दिली, जो पाठिंबा दिला त्यासाठी आम्ही आभारी आहोत.’'  

”आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या स्त्रिया या विविध पातळीवर विविध भूमिका सक्षमपणॆ बजावत असताना त्यांची तारांबळ उडते आणि तरीही घरातील पुरुष मात्र त्यांना गृहीत धरत असतात. हा लघुपट निव्वळ एक कलाकृती नसून प्रत्येक महिलेच्या कर्तृत्वाला मानवंदना देणारी कलाकृती आहे,” असे लघुपटाचे प्रस्तुतकर्ता कॉटन किंगचे संचालक कौशिक मराठे यांनी सांगितले.