मुंबई : ऐतिहासिक घटना, व्यक्ती, प्रसंग किंवा एखादा ऐतिहासिक घटक पकडून त्यावर साकारण्यात आलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांनी कायमच पसंती दिली आहे. विविध भाषांमध्ये आजवर कैक ऐतिहासिकपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. इतिहासाची साथ घेत एका अविस्मरणीय काळाचीच जीवंत अनुभूती देणाऱ्या याच चित्रपटांमध्ये आता आणखी एका पात्राचं आणि अर्थातच आणखी एका ऐतिहासिक घटनेचं नाव जोडलं जाणार आहे.
भारताचे पहिले नौदल प्रमुख ज्यांचा समुद्रातील शिवाजी म्हणून अखंड मुलखात परिचय होता, ज्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग फक्त समुद्रालाच ठाऊक होता असे सरखेल कान्होजी आंग्रे, यांचंच ते नाव. कान्होजी आंग्रे यांची ख्याती क्रीएटीव्ह मदारीस प्रस्तुत राहुल जनार्दन जाधव यांच्या 'कान्होजी आंग्रे' या चित्रपटातून पाहता येणार आहे.
'कान्होजी आंग्रे' या चित्रपटाच्या निमित्तानं समुद्राच्या लाटा आणि या दर्याच्या भोवती त्याच्याइतकंच गहिरं असणारं राजकारण अचूक हेरून सुरत ते दक्षिण कोकणचा किनारा एकट्याने सुरक्षित ठेवणाऱ्या या वीर समुद्रातील गनिमी काव्याचे जनक अशी ओळख असलेल्या प्रथम नौदल सैनिकाची कामगिरी प्रेक्षकांच्या नजरेस येणार आहे. कान्होजी आंग्रे यांची शौर्य गाथा ही प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचावी या उद्देशानं २०२२ मध्ये या चित्रपटाची टीम हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. सुधीर निकम लिखित या चित्रपटाकडून साऱ्यांनाच अनेक अपेक्षा असतील ही बाब नाकारता येणार नाही.