शाहरुख खानची प्रमुख भूमिका असणाऱ्या जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: वादळ आणलं आहे. जानेवारी महिन्यात शाहरुख खानने 'पठाण' चित्रपटातून 4 वर्षांनी बॉक्स ऑफिसवर पुनरागमन केलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड्स रचले होते. पण जवान चित्रपटाने पठाणवरही मात केली असून, शाहरुख खानला पुन्हा एकदा बॉलिवूडचा बादशाह ठरवलं आहे.
गुरुवारी प्रदर्शित झालेल्या जवानची तिकीटं मिळणं कठीण झालं आहे. दाक्षिणात्य मसाल्याने भरपूर असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. गुरुवारी प्रदर्शित होताच 'जवान' हा बॉलिवू़डच्या इतिहासातील सर्वात मोठी ओपनिंग मिळालेला चित्रपट ठरला आहे. शुक्रवारी वर्किंग डे असल्याने कमाईवर थोडा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. पण शनिवारी शाहरुखच्या चित्रपटाने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली असून, जबरदस्त कामगिरी केली आहे.
जवान चित्रपटाने पहिल्या दिवशी 75 कोटींची कमाई केली होती. यानंतर शुक्रवारी प्रतिसाद थोडा कमी झाल्याचं दिसत होतं. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने देशात 53 कोटींहून अधिक कमाई केली. पण शनिवारी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठी झेप घेतली. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने जवळपास पहिल्या दिवसाइतकीच कमाई केली आहे.
ट्रेड रिपोर्टनुसार, तिसऱ्या दिवशी चित्रपटाने देशभरात 73 ते 15 कोटी रुपये कमावले आहेत. म्हणजे तीन दिवसातच चित्रपटाने 200 कोटींचा आकडा पार केला आहे. शनिवारनंतर 'जवान'ची कमाई 201 कोटींहून अधिक झाली आहे.
जानेवारी शाहरुखचा चित्रपट 'पठाण'ने 4 दिवसांत 200 कोटींपेक्षा जास्त कमाई करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. पण जवानने फक्त 3 दिवसांत ही कमाल केली आहे. यासह सर्वात वेगाने 200 कोटींचा टप्पा पार करणारा जवान पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. शाहरुखच्या दोन चित्रपटांनंतर तिसऱ्या क्रमांकावर याचवर्षी प्रदर्शित झालेला 'गदर 2' आहे. सनी देओलच्या चित्रपटाने 5 दिवसांत 200 कोटी कमावले होते.
हिंदी चित्रपटाच्या इतिहासात आतापर्यंत तिसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड गदर 2 च्या नावे होते. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 51.7 कोटी रुपये कमावले होते. 'गदर 2' च्या आधी 51.5 कोटींसह 'पठाण' चित्रपटाच्या नावे हा रेकॉर्ड होता. आता दोन्ही रेकॉर्ड जवानच्या नवे आहेत. रिपोर्ट्सनुसार, शनिवारी फक्त हिंदीत जवान चित्रपटाने 65 कोटींपेक्षा अधिकची कमाई केली. यासह जवान प्रदर्शनानंतर तिसऱ्या दिवशी आणि शनिवारी सर्वाधिक कमाई कऱणारा चित्रपट ठरला आहे.
जवानने फक्त दोन दिवसातच जगभरात 240 कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने एकूण 90 कोटींची कमाई केली. यासह शाहरुख खानच्या चित्रपटाने जगभरात 350 कोटींची कमाई पार केली आहे.