इरफान खानच्या तब्येतीबाबत प्रवक्त्याची माहिती

'इरफानच्या आरोग्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवा अतिशय निराशाजनक आहेत'

Updated: Apr 29, 2020, 12:05 PM IST
इरफान खानच्या तब्येतीबाबत प्रवक्त्याची माहिती title=
संग्रहित फोटो

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खानला त्याच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान इरफानच्या तब्येतीबाबत अनेक अफवा पसरवल्या जात असल्याचं सांगत, याबाबत इरफानच्या प्रवक्त्याने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन केलं आहे.

'इरफानच्या आरोग्याबद्दल, तब्येतीविषयी पसरवल्या जाणाऱ्या अफवा अतिशय निराशाजनक आहेत. अनेक चाहते काळजी करतात ही बाब कौतुकास्पद आहे. परंतु काही लोक ज्याप्रमाणे अफवा पसरवून अशांतता पसरवण्याचं काम करत आहेत हे अतिशय निराशाजनक आहे. इरफान अतिशय मजबूत व्यक्ती असून तो अजूनही लढाई लढत आहे', असं इरफानच्या प्रवक्तांनी म्हटलंय.

इरफानच्या तब्येतीविषयी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. अफवांसारख्या कोणत्याही काल्पनिक संभाषणांमध्ये भाग न घेण्याचीही त्यांनी विनंतीही त्यांनी चाहत्यांनी केली आहे. आम्ही इरफानच्या तब्येतीविषयी नेहमीच सक्रियपणे स्पष्टीकरण दिलं आहे आणि यापुढे त्याविषयी नेहमी अपडेट देत राहू, असं इरफान खानच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

इरफानला गेल्या काही वर्षांपूर्वी त्याला हाय ग्रेड न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर असल्याचं समजलं होतं. 2017च्या जून महिन्यात या आजाराबाबत समजल्यानंतर इरफान परदेशात या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी गेला होता. इरफानने स्वत: त्याच्या आजाराबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती. 

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे असणाऱ्या लॉकडाऊनमध्ये इरफानच्या आई सईदा बेगम यांचं निधन झालं. मात्र लॉकडाऊनमुळे इरफान त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहचू शकला नाही. त्याने व्हिडिओ कॉलवरुच आपल्या आईचं अंतिम दर्शन घेतलं होतं.