जगभरातील फिल्म फेस्टिवल घरीच पाहा

यूट्यूबवर रंगणार ग्लोबल फिल्म फेस्टिव्हल

Updated: Apr 28, 2020, 08:30 PM IST
जगभरातील फिल्म फेस्टिवल घरीच पाहा title=

ब्युरो रिपोर्ट : कोरोनाच्या संकटामुळे सगळे फिल्म फेस्टिवल रद्द झाले असले तरी सिनेरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगभरातले एकापेक्षा एक सरस चित्रपट तुम्हाला घरी बसल्या पाहता येणार आहेत. लॉकडाऊनमध्ये ही अनोखी पर्वणी सिनेरसिकांसाठी चालून आली आहे.

चीनमध्ये थैमान घातल्यानंतर कोरोना व्हायरसने जगभरात आपले हातपाय पसरले. इटली, फ्रान्स, अमेरिका यांसारख्या मोठ्या राष्ट्रांना या कोरोनाने हतबल केलं. यानंतर या कोरोनाचं संकट भारताच्या उंबरठ्यावर येऊन पोहचलं. आर्थिक दृष्ट्या प्रत्येक क्षेत्राला मोठं नुकसान सहन‌ करावं लागत आहे. यात मनोरंजन विश्वही अपवाद नाही.

कान्स, बर्लिन सारखे मोठे फिल्म फेस्टिव्हल रद्द झाले. या सगळ्या नकारात्मक गोष्टी घडत असतानाच आता सिने रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. जगातले २० हून अधिक मोठे फिल्म फेस्टिव्हल तुम्हाला घरीच पाहता येणार आहेत. या सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या सिनेमांचं स्ट्रिमिंग थेट युट्यूबवर  करायचं ठरवलं आहे. विशेष म्हणजे हे सगळे सिनेमे फ्री दाखवण्यात येतील. यात कान्स, बर्लिन, वेनिस, टोरेंटो सारख्या बड्या फिल्म फेस्टिव्हलचा समावेश आहे.

अर्थात या फिल्म फेस्टिवलसाठी तुम्हाला महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. दहा दिवस रंगणाऱ्या  या ग्लोबल फिल्म फेस्टिव्हलला येत्या २९ मे पासून सुरुवात होईल. एकूणच काय तर जगभरातले सर्व फिल्म फेस्टिव्हल मिळून एक फ्री ऑनलाईन ग्लोबल  फिल्म फेस्टिव्हल करणार आहेत. विशेष म्हणजे या ग्लोबल फिल्म फेस्टिव्हलमध्ये मुंबई फिल्म फेस्टिव्हलचाही समावेश असेल.

एकतर तुम्हाला लॉकडाऊनमुळे वेळही आहे आणि फिल्म फेस्टिवल तुमच्या घरीच उपलब्ध होणार आहे. याशिवाय त्यासाठी पैसेही मोजावे लागणार नाहीत. त्यामुळे ही प्रेक्षकांसाठी ही सुवर्णसंधीच आहे.

 

हा फिल्म फेस्टिव्हल मोफत असल्यानं सिने रसिकांना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या कोविड फंडमध्ये मदत करण्याची विनंती करण्यात आली आहे.