तरुणाईची भाषा बोलणारा 'ह्यो माझा शिवाजी'

  हे नाटक आजच्या पिढीतल्या तरुणांची भाषा बोलणारे असल्याने तरुण वर्गाला आकर्षित करत

Pravin Dabholkar Updated: May 2, 2019, 12:40 PM IST
तरुणाईची भाषा बोलणारा 'ह्यो माझा शिवाजी'

प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई : अनेकांच्या मनात स्वत:बद्दल एक न्यूनगंड असतो..स्वत:दिसण्याबद्दल, जातीबद्दल, रंग, भाषा कशाबद्दलही तो असू शकतो... या न्यूनगंडावर मात करत प्रस्थापितांना आव्हान देता आलं  की यश हाकेच्या अंतरावर आलेलं असतं...'ह्यो माझा शिवाजी नाटका'ची एका ओळीतील कहाणी आहे.. खरंतर नाटकाबद्दल वाचून, ऐकून जाण्यापेक्षा ते प्रत्यक्षात अनुभवण्यात खरी मज्जा आहे...नाटक “महाराजांवर”आधारीत नाही पण नाटकात महाराज आहेत..अशी पोस्टरवरील टॅगलाईन वाचल्यावर उत्सुकता वाढते...यामध्ये महाराजांचे दोन चेहरे एकमेकांकडे पाहताना दिसतात. हे पाहून आपण नाटकाविषयी काहीतरी ठोकताळे बांधतो पण नाटक संपताना आपल्याला एका नवा संदेश मिळालेला असतो...

महाराज हा सर्वांसाठीच निष्ठेचा विषय... ते विशिष्ट जात, धर्मासाठी नव्हे तर ते स्वराज्यासाठी जगले...तरीही आपल्याकडे त्यांच्यामागे रंग, जात जोडून आपण त्यांना आपल्या विशिष्ट चष्म्यातूनच पाहत आलोय हे दुर्देव..आपल्या कर्तृत्वाने इतिहासाल नोंद घेण्यास भाग पाडणाऱ्यांना आपण देवांच्या रांगेत नेऊन बसवलंय...जिथे देवपण येते तिथे सर्वच अमर, अपराजित वाटू लागतं.. जे एखाद्या कर्तृत्वपुरूषाला त्याच्या कर्तृत्वापासून दूर नेते. माणूस आणि कर्तुत्ववान पुरूष यांच्यातील हीच दरी दूर करण्याचा या नाटकाचा प्रयत्न आहे.

नाटकाच्या सुरूवातीला तुम्ही स्वत:च्या “चष्म्यातून” महाराज पाहता...ज्यात नाटकाचा सेट तुम्हाला महाराजांच्या दरबारात घेऊन जाईल.. महाराज येण्याची वर्दी दिली जाते..महाराज येतात...दरबाराकडे पाहतात... सिंहासनावर विराजमान होता... सोबत मावळे आहेत...महाराजांसाठी पोवाडा गायला जातोय..या पोवाड्यातील प्रत्येक शब्द तुम्हाला गुंतवून ठेवेल..महाराज प्रमाण भाषेत अदबीने संवाद साधतानाही दिसतील...पण थांबा...यानंतरची वेळ ही तुम्ही आणलेला “चष्मा” उतरवण्याची असू शकते...कारण हीच वेळ असते जिथे लेखक/दिग्दर्शक तुम्हाला एक चष्मा देतो आणि एक कहाणी हळूहळू उलगडत जाते...

ही कहाणी आहे किरण्याची...शिवाजीच्या नाटकात मावळ्याची भूमिका करणारा किरण्या...अतिसामान्य घरातला...सावळ्या रंगाचा...कोणाशी फारसा न बोलणारा...स्वत:च्याच विश्वात जास्त रमणारा असा किरण्या...पण खूप वर्षे तीचतीच भूमिका करुन आता किरण्याला नाटकं पाठ झालंय....आता त्यालाही 'शिवाजी' साकारायचा आहे...हो..नाटकात का होईना..त्याला शिवाजी व्हायचय..पण प्रस्थापितांना शिवाजी आवडतोय तो आत्मविश्वासू, शुद्ध मराठी प्रमाण भाषा बोलणारा...त्यात किरण्याचा न्यूनगंड तसं होऊ देत नाहीए.शिवाजी बनण्यासाठी त्याला स्वत:च्या मनासोबतच प्रस्थापितांशीही बंड करावे लागणार आहे...रंगाने सावळा असणारा..मोजक शिकलेला..प्रमाण भाषाही येत नसलेला गावंढळ किरण्या 'शिवाजी' होईल का ? प्रस्थापित त्याला तिथपर्यंत पोहोचू देतील का ? हा प्रवास सांगणारं हे नाटक आहे..

“अरबी समुद्रात महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यापेक्षा महाराज्यांच्याच उंचीचा पुतळा उभारून त्यांचे कार्य किती भव्य होते हे सांगायला हवं” (टाळ्या आणि शिट्टया)

'खरी ताकद ही तलवारीत नाही तर मनगटात असते. तुझ्या आईने जरी मला ही तलावर दिली असती तरी मी त्याच स्फुर्तीने लढलो असतो' (टाळ्या आणि शिट्या) 

अशी अनेक वाक्य नाटकात प्रेक्षकांची मने जिंकतात.

नाटक पाहत असताना अनेक ट्वीस्ट येतात...किरण्याचे साथीदार कधी खळाळून हसवतात..तर किरण्याची द्विधा मनस्थिती टचकन डोळ्यात पाणी आणते. नाटकाच्या शेवटी भाव खाऊन जातो ते किरण्या म्हणजे अभिनेता विपुल काळे. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला उत्तम न्याय दिलाय. मग ते किरण्याची आई किंवा संवगडी असो वा 'शिवाजी'ची मित्रमंडळी.. प्रत्येक कलाकारची कलाकृती काही शिकवून जाते. महारांजाचे सिंहासन, महालाचे दरवाजे, किरण्याची झोपडी, चूल यातील बारकावे नेपथ्यकार सुमित पाटीलने हुबेहुब टीपले आहेत. उत्तम अभिनेता असलेल्या समीर खांडेकरच तिततच उत्तम लेखन दिग्दर्शन 'ह्यो माझा शिवाजी'मध्ये पाहायला मिळेल. हे नाटक आजच्या पिढीतल्या तरुणांची भाषा बोलणारे असल्याने तरुण वर्गाला आकर्षित करतं आणि नाटक संपताना 'ह्यो माझा शिवाजी हाय' असं वाटू लागतं.