'Fighter' चित्रपट रिलीज होण्याआधी ह्रतिक-दीपिकाला मोठा धक्का; 'या' देशांनी घातली बंदी

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन आणि दीपिका यांची प्रमुख भूमिका असणारा 'फायटर' चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. पण चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दोन दिवस आधीच आखाती देशांनी बंदी घातली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 24, 2024, 12:25 PM IST
'Fighter' चित्रपट रिलीज होण्याआधी ह्रतिक-दीपिकाला मोठा धक्का; 'या' देशांनी घातली बंदी title=

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन आणि दीपिका यांची प्रमुख भूमिका असणारा 'फायटर' चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. शाहरुख खानसह 'पठाण' सारखा सुपरहिट चित्रपट देणाऱ्या सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ह्रतिक आणि दीपिका पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. पण चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक असतानाच मोठा धक्का बसला आहे. 

ह्रतिक रोशनच्या 'फायटर' चित्रपटावर आखाती देशांनी बंदी घातली आहे. यामुळे पाच आखाती देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकणार नाही. ही बंदी नेमकी का घातली याचं कारण समोर येऊ शकलेलं नाही. याचं कारण समोर येण्याची वाट पाहिली जात आहे. 

आखाती देशांमध्ये 'फायटर'वर बंदी

चित्रपट व्यवसाय तज्ज्ञ गिरीश जोहर यांनी सोशल मीडियावर पाच आखाती देशांमध्ये ह्रतिकच्या 'फायटर' चित्रपटावर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. फक्त संयुक्त अरब अमिरातीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जिथे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला PG15 रेटिंगसह रिलीजसाठी मंजुरी दिली आहे. 

खाड़ी सहकार्य परिषद म्हणजेच Gulf Cooperation Council मध्ये बहारीन, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) यांचा समावेश आहे. संयुक्त अरब अमिरात वगळता सर्व देशांनी चित्रपटावर बंदी घातली आहे. पण या बंदीमागील कारण त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.

गिरीश जौहर यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, "हा मोठा धक्का आहे. फायटरला मिडल ईस्ट क्षेत्रांनी चित्रपटगृहातील रिलीजसाठी अधिकृत बंदी घातली आहे. फक्त UAE चित्रपटाला PG15 रेटिंगसह रिलीज करणार आहे".

चित्रपटाच्या कमाईवर परिणाम

भारतीय चित्रपटांच्या जगभरातील कमाईत आखाती देशांचा मोठा वाटा असतो. भारतीय चित्रपटांसाठी हे एक चांगलं मार्केट आहे. अशात 'फायटर'सारख्या चित्रपटाला एक मोठी बाजारपेठ गमवावी लागणार आहे. ज्याचा फरक कमाईवरही पडेल. रिपोर्ट्सनुसार, फायटरचं बजेट 250 कोटींच्या आसपास आहे. अशात ही बंदी कमाईवर मोठा परिणाम करेल. 

ह्रतिक रोशन आणि दीपिका यांचा 'फायटर' चित्रपट भारतीय हवाई दलातील वैमानिकांवर आधारित आहे, ज्यांच्यावर पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी आहे. हा चित्रपट बालाकोट हवाई हल्ल्यावर आधारित आहे. चित्रपटात ह्रतिक आणि दीपिकासह अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर, संजीदा शेख आणि अक्षय ओबेरॉय आहेत.