श्रेयस तळपदेला नेमकं काय झालं होतं? रुग्णालयाने दिली माहिती; म्हणाले 'अँजिओप्लास्टीनंतर...'

मराठी आणि बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयाने त्याच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 15, 2023, 04:04 PM IST
श्रेयस तळपदेला नेमकं काय झालं होतं? रुग्णालयाने दिली माहिती; म्हणाले 'अँजिओप्लास्टीनंतर...' title=

मराठी आणि बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याला मुंबईच्या अंधेरी येथील बेलेव्यू रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. गुरुवारी संध्याकाळी त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याची माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्याने दिली असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. 

रुग्णालयातील कर्मचाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, "गुरुवारी संध्याकाळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर रात्रीच अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या तो आयसीयूत आहे". मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस तळपदे सध्या 'वेलकम टू जंगल' चित्रपटाचं शुटिंग करत आहे. शुटिंगवरुन घरी परतल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

दरम्यान श्रेयस तळपदेच्या कुटुंबातील सदस्याने त्याची प्रकृती सुधारत असून मीडियाकडे खासगीपणाचा आदर करण्याची विनंती केली आहे. "त्याची प्रकृती सुधारत आहे. सध्या तो उत्तम आहे. कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा अशी विनंती आहे," असं कुटुंबातील सदस्याने पीटीआयशी संवाद साधताना म्हटलं.

श्रेयस तळपदेच्या पत्नीची पोस्ट

दिप्तीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये श्रेयसच्या प्रकृतीसंदर्भातील समस्येनंतर त्याच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना करणाऱ्या, विचारपूस करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. "माझ्या पतीच्या आरोग्यासंदर्भातील घडामोडीनंतर ज्यांनी ज्यांनी काळजी व्यक्त केली आणि त्याच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मी आभार मानते. मला सर्वांना हे सांगताना समाधान वाटत आहे की आता त्याची (श्रेयसची) प्रकृती स्थिर आहे. त्याला काही दिवसांमध्ये रुग्णालयातून घरी सोडलं जाईल.

दिप्तीने रुग्णालयामध्ये श्रेयसची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही आभार मानले आहेत. "रुग्णलयामधील मेडिकल टीमने घेतलेली काळजी आणि वेळीच दिलेल्या प्रतिसादाचा या कठीण काळामध्ये फार फायदा झाले. त्यांच्या मदतीसाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत," असा उल्लेख दिप्तीच्या या पोस्टमध्ये आहे.

"त्याची (श्रेयसची) रिकव्हरी सुरु असल्याने आमच्या खासगीपणाचा तुम्ही सर्वजण आदर कराल अशी अपेक्षा आहे. तुमच्या पाठिंब्याचा आम्हाला दोघांनाही फार आधार वाटतोय," असंही पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.

श्रेयस तळपदे मराठी आणि बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये झळकला आहे. 'इकबाल' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटाला समीक्षकांनीही पसंती दर्शवली होती. तसंच 'डोर', 'ओम शांती ओम', 'वेलकम टू सज्जनपूर', 'हाऊसफूल 2', 'गोलमाल' अशा अनेक चित्रपटांमध्ये तो झळकला आहे. 2019 मध्ये 'कौन प्रवीण तांबे' चित्रपटात तो झळकला होता. 

श्रेयस तळपदेने 'पोस्टर बॉईज'सह अनेक मराठी चित्रपटांचीही निर्मितीही केली आहे. बाजी, बायो, सनई चौघडे, सावरखेड एक गाव, पछाडलेला आणि आपडी थापडी या चित्रपटांमध्ये तो झखला आहे. त्याने 2021 मधील सुपरहिट चित्रपट 'पुष्पा: द राइज'च्या हिंदी व्हर्जनमध्ये अल्लू अर्जुनच्या पात्राला आवाज दिला होता. 'एमर्जन्सी' चित्रपटातही तो दिसणार आहे.