Kalki 2898 AD Copy Scene : 'कल्कि 2898 एडी' चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर हॉलिवूड कॉम्सेप्ट आर्टिस्ट ऑलिवर बेक आणि सुंग चोई यांनी वैजयंती मूव्हीजवर आरोप केला आहे. या आरोपात ऑलिवर बेक आणि सुंग चोई म्हणाले की त्यांचं आर्टवर्क वैजयंती मूव्हीजनं चोरलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली होती. आता मुलाखतीत बेकनं खुलासा केला की 'कल्कि 2898 AD' निर्मात्यांनी सुरुवातीला चित्रपटासाठी काम करण्यासाठी संपर्क केला होता. पण त्यांच्यात काही कारणामुळे सगळं जुळून आलं नाही. जेव्हा त्यांनी 10 जूनला प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहिला तेव्हा त्यांचं काम चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
ऑलिवर बेक आणि सुंग चोई दोघांनी ट्रेलरसोबत त्यांच्या कामाचं कोलाज देखील शेअर केलं आहे. मात्र, चोईनं नंतर त्याचं ट्वीट काढून टाकलं होतं. पण बेकनं 'कल्कि 2898 एडी' च्या निर्मात्यांवर केलेल आरोप तसेच राहू दिले. ऑलिवरनं सांगितलं की 'चोईच्या ट्वीटनं त्याला तो ट्रेलर पाहण्यासाठी प्रेरित केलं. ज्यात त्याला त्यांच्या कामात समानता दिसली. त्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की सुंग चोईनं आधीचं ट्विटर म्हणजेच आताच्या X अकाऊंटवर 'कल्कि 2898 एडी' चा ट्रेलर शेअर करत त्याचं काम चोरी होण्याविषयी सांगितलं आणि मग मी ट्रेलरवर क्लिक केलं आणि पाहिलं की माझ्या कामातून देखील त्यांनी चोरी केली आहे.'
ऑलिवर बेकनं याविषयी सांगितलं आणि म्हटलं की 'जेव्हा तुम्ही कलाकार नसता, तेव्हा तुम्ही साहित्याची चोरी होताना पाहणं कठीण होऊ शकतं. असं होऊ शकतं की तुम्ही ते लगेच पाहत नसाल, पण माझ्या सगळ्या कलाकार मित्रांनी ज्यांच्याशी मी चर्चा केली आणि तसही सगळ्यांना माहित आहे की हे माझ्या कामातून घेतलं आहे. त्यासोबत तुम्ही पाहू शकता की हा खूप मोठा योगा-योग आहे. कारण त्यांनी या चित्रपटासाठी काम करण्यासाठी मला देखील फोन केला होता. त्यामुळे त्यांना माझा पोर्टफोलियो माहितीये. त्यांनी माझं काम पाहिलंय, त्यामुळे हा खूप मोठा योगा-योग नक्कीच आहे.'
कायदेशीर कारवाई विषयी ऑलिवर बेकनं सांगितलं की 'हे खूप आव्हानात्मक असेल कारण त्याच्या कामाची थेट कॉपी करण्यात आलेली नाही. त्यांनी सांगितलं की कायदेशीर निर्णय प्रकरणात, माझ्या बाजूनं पाहायचं झालं तर, मी जास्त काही करु शकत नाही कारण माझं काम स्पष्टपणे कॉपी करण्यात आलेलं नाही. कायदेशीर निर्णय येण्याआधी हे स्पष्ट झालं पाहिजे. जसं सुंग चोईच्या प्रकरणात होतं कारण त्यांनी त्याचं संपूर्ण काम जसंच्या तसं कॉपी केलं होतं.'
हेही वाचा : सोनाक्षी-झहीरचे मेहंदी सेरेमनीतील फोटो समोर; शत्रुघ्न सिन्हांच्या लेकीच्या आनंदानं वेधलं लक्ष
'कल्कि 2898 AD' च्या निर्मात्यांशी संपर्क केल्यानंतर त्यांनी या प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नाग अश्विन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहेत. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाच्या कास्टिंगविषयी बोलायचं झालं तर त्यात अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, प्रभास, कमल हासन आणि दिशा पटानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर हा चित्रपट 27 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.